इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीची बदनामी करणाऱ्या संशयितास जामीन

रत्नागिरी:- तालुक्यातील अल्पवयीन मुलगी आहे म्हणून प्रेमसंबंध नकाराले; संपर्क ही तोडला मात्र सोशल मिडियाच्या इन्स्टाग्रामवर फेक आयडी तयार करुन त्यावर मुलीचे अश्लील फोटो प्रोफाईल व स्टोरीवर ठेवणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बुधवारी न्यायालयाने दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी व 25 हजाराचा सशर्त जामीन मंजूर केला.

युवराज हेमंत राठोड (वय 20, रा. कारवांचीवाडी, मुळ : जालवाद, ता. देवरहिप्पी, जि. विजापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना 11 ते 12 सप्टेंबर सकाळी आठच्या सुमारास इन्स्टाग्राम ॲपवर निदर्शनास आली. मिळालेल्या माहितीनुसार संशयित युवराज याने पिडीत मुलगी अल्पवयीन होती म्हणून प्रेमसंबंध चालू ठेवले नाहीत तिच्याशी संपर्कही तोडला मात्र त्याने पिडीत मुलीची बदनामी करण्याच्या हेतूने इन्स्टाग्रामवर फेक आयडी काढून तिचे अश्लील फोटा अपलोड केले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध भादवी कलम 354 (अ) 500 पोक्सो कायदा कलम 8,12 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 (ब) नुसार गुन्हा दाखल केला होता. तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस करत होते. तपासात पोलिसांनी संशयितास अटक केली होती. न्यायालयाने गुरुवारी (ता. 21) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या प्रकरणी संशयिताने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. बुधवारी (ता. 27) अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. अंबालकर यांच्या न्यायालयात जामिन अर्जावर सुनावणी झाली. आरोपीतर्फे ॲड. सचिन पारकर यांनी या प्रकरणी युक्तीवाद केला. न्यायालयाने दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी व 25 हजार असा सशर्त जामीन मंजूर केला.