जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत ‘कचरामुक्त भारत’ अभियान

रत्नागिरी:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोन ऑक्टोबर हा दिवस ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘स्वच्छ भारत दिवस’च्या निमित्ताने 15 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छ भारत’ मिशन ग्रामीण अंतर्गत ‘कचरामुक्त भारत’ अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली.

‘स्वच्छ भारत’ मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ची थीम ‘कचरामुक्त भारत’ आहे. यामध्ये ‘दृष्यमान स्वच्छता’ व ‘सफाईमित्र कल्याण’ यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंर्स्फूर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे.

स्वच्छता मोहिमेला लक्ष केंद्रीत करून ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदी सार्वजनिक ठिकाणी शहरी व ग्रामीण भागात संयुक्त मोहीम राबविण्याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या सूचना आहेत. त्यानुसार उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सीईओ कीर्तीकिरण पुजार यांनी सांगितले.
या मोहिमेला शुक्रवारी सुरूवात झाली असून, शनिवारी सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेची शपथ व शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी गावागावातून काढण्यात आली.

स्वच्छता श्रमदान मोहीम हाती घेण्यात आली होती. या सर्व उपक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातील खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांना नोडल ऑफिसर म्हणून ग्रामपंचायतींमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
या श्रमदान मोहिमेत तसेच ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.