दोन दिवसात अडीच हजार चाकरमान्यांची आरोग्य तपासणी

रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे दाखल झालेले आहेत. अजूनही मुंबईहून गाड्या येत आहेत. या कालावधीत साथींचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी गेले दोन दिवस गावाकडे येणाऱ्या 2 हजार 397 चाकरमान्यांची आरोग्य पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सर्दी, ताप, खोकला असलेले ३९ तर इतर आजार असलेले चाकरमानी आढळले. त्यामधील ८६ चाकरमान्यांवर जागेवरच उपचार करण्यात आले.

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या दिमतीला मुंबई-गोवा महामार्गासह बसस्थानक, रेल्वेस्टेशनवर आरोग्य विभागाने तपासणी केंद्र ठेवलेली आहेत. जिल्ह्यात 16 सप्टेंबरपासून आरोग्य पथके तैनात आहेत. मुंबईहून येणाऱ्या गाड्यांमधील आजारी चाकरमान्यांची तपासणी करणे किंवा त्यांना आवश्यकता भासल्यात मदत करण्यात येत आहे. गावात हजारो चाकरमानी आलेले आहेत. सध्या मुंबईत डेंग्युसह ताप, डोळे येणे असे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यात 23 ठिकाणी आरोग्य पथके तैनात केलेली आहेत. शनिवारीपासून झालेल्या तपासणी मोहिमेत 16 सप्टेंबरला 1 हजार 135 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ताप, सर्दी, खोकला असलेले 18 जणं आहेत. इतर आजार असलेल्या व्यक्तींची संख्या 2, उपचार केलेल्या व्यक्तींची संख्या 20 जणांचा समावेश आहे. 17 सप्टेंबरला 1 हजार 262 चाकरमान्यांची तपासणी करण्यात आली आहे. ताप, सर्दी, खोकला असलेल्या 21 रूग्ण आढळले. तर इतर आजार असलेल्यांमध्ये 45 जण तर 66 जणांवर उपचार करण्यात आले. खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य पथकामार्फत करण्यात आले आहे.