कोकणनगर पर्यंतच्या अकरा अनधिकृत बांधकामांना रनपकडून नोटिसा

रत्नागिरी:- शहरातील चर्मालयापासून कोकण नगरपर्यंत रस्त्याच्या कडेला असलेली अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याची नोटीस रत्नागिरी नगर परिषदेने बजावली आहे. यामध्ये कोकण नगर पोलिस चौकीचाही समावेश आहे. नोटीस मिळाल्यापासून चोवीस तासांच्या आत ही बांधकामे काढण्याच्या सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या. या नोटीसला वीस दिवस होऊन गेले तरी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी दादच दिलेली नाही. ही बांधकामे आहेत तशीच आहेत.

कोकण नगर येथील रस्त्याच्या एका बाजूला अनेक अनधिकृत शेड आणि बांधकामे आहेत. यामध्ये व्यवसाय केले जात असून या अनधिकृत दुकानांबाबत येथील रहिवाशांकडून रत्नागिरी परिषदेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या जात होत्या. अखेर २४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी नगर परिषदेने या सर्व अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस काढल्या. रत्नागिरी शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेमधील रस्ता रुंदीत येणारी ३० मीटरपर्यंतची जागा रत्नागिरी नगरपरिषदेच्या मालकीची असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. नगरपरिषदेच्या या जागेत अनेक शेड, खोके उभारून तेथे दुकाने चालवली जात आहेत. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ अन्वये ही नोटीस मिळाल्यापासून एका दिवसात ही अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा ती रनपकडून हटवली जाऊन त्यासाठी येणारा खर्च वसूल करण्यात येईल, असेही नोटीसद्वारे कळवण्यात आले आहे; परंतु आता या नोटीसना पंधरा दिवस होऊन गेले तरी कोणत्याही दुकानदाराने आपले बांधकाम स्वत:हून काढलेले नाही.

कोकण नगरकडून शहराकडे येणारा मार्ग हा व्हीआयपी रस्ता म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपरिषदेने ही अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याबाबत दिलेल्या नोटीसना महत्त्व आहे. मात्र नोटीस देऊनही अतिक्रमण धारकांना जाग आलेली नाहीं आता रत्नागिरी नगर परिषद कारवाई करण्यासंदर्भात कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.