साडवली:- पूर गावातील सप्तलिंगी नदीत रविवारी २ तरुण बुडाले होते. त्या ठिकाणी मासेमारीसाठी जाळे टाकण्यात आले होते. या जाळ्यात सचिन झेपले यांचा एक पाय अडकलेला होता. सोमवारी दुपारी हे जाळे ओढत असताना ग्रामस्थांना ते जड जाणवले. जाळे वर ओढले असता झेपले यांचा मृतदेह त्यात असल्याचे आढळल्याने देवरूख पोलिस ठाण्यात कळवण्यात आले.
देवरूखजवळील पूर गावातील दोन सख्ख्या भावांचा सप्तलिंगी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १०) दुपारी दोनच्या दरम्याने घडली होती. यातील गणेश रामचंद्र झेपले यांचा मृतदेह रविवारी संध्याकाळी सापडला, तर सचिन झेपले (३२) हे बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह कुडवली + बौद्धवाडी येथे सोमवारी दुपारी मिळाला. देवरूख ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पोवार व सहकारी यांनी कुडवली येथे जाऊन पंचनामा केला. देवरूख येथे मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
गणेश झेपले हे अविवाहित होते. रविवारी दुपारी सचिन झेपले पत्नीसह कपडे धुण्यासाठी नदीवर गेले होते. या वेळी सचिन झेपले हे पोहण्यासाठी नदीत उतरले. या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. हा प्रकार पत्नीच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला; मात्र जवळपास कोणी नव्हते. यामुळे तिने धावतच घरी जाऊन दीर गणेश झेपले यांना हा प्रकार सांगितला. भावासाठी लगेचच गणेश झेपले यांनी पाण्यात उडी मारली; पण दुर्दैवाने त्यांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेने पूर गावावर शोककळा पसरली आहे.