जिल्ह्यात भूमिगत वीजवाहिन्यांसाठी ७५० कोटी

चक्रीवादळ धोके निवारण; किनारी भाग होणार सुरक्षित

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानंतर जिल्ह्यातील अन्य किनारी भागातील गावांमध्येही भूमिगत विद्युतवाहिन्यांच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. त्यासाठीच्या ३०० कोटीच्या प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे पावसाळ्यातील वादळवारे आदींमुळे विद्युत खांब कोलमडून किंवा मुख्य वीजवाहिन्या तुटून विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार थांबणार आहेत. किनारी भागातील ग्राहकांना नैसर्गिक आपत्तीतही विनाव्यत्यय विद्युत पुरवठा मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गतही सुमारे ४५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे सुमारे साडेसातशे कोटीचा हा प्रकल्प जिल्ह्याच्या किनारी भागात राबवला जाणार आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. रत्नागिरी शहर आणि परिसरासाठी सुमारे 94 कोटीचा भूमिगत विद्युतवाहिन्यांच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे तर काही ठिकाणी ते सुरू झाले आहे. सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी शहराचाच विचार झाला होता; मात्र निसर्ग चक्रीवादळाने महावितरणला मोठा तडाखा दिल्यामुळे महावितरण कंपनीने भविष्यातील मोठे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ 608 कोटीचा नवा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता.

राज्याचे उद्योगमंत्री आणि तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा करून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महावितरणकडून हा प्रस्ताव पाठवण्यात आला. यामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांसाठी रत्नागिरी ग्रामीण, राजापूर, गुहागर, दापोली, मंडणगड 1 प्रभागांची निवड करण्यात आली आहे.

  • निसर्ग वादळाचा मोठा तडाखा किनारपट्टीला बसला. वीजवाहिनीवर झाडे कोसळून पुरवठा ठप्प झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन ते अडीच महिन्याचा कालावधी गेला. याशिवाय सुमारे 35 कोटीच्या दरम्यान महावितरणचे नुकसान झाले. महावितरण कंपनीच्या विद्युततारांचे जाळे उघड्यावर असल्याने किनारी भागात ही मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यावर उपाय म्हणून महावितरण कंपनीने जिल्ह्यातील किनारी भागातील हा प्रस्ताव तयार केला होता.