तरुणांचा कल कृषी पर्यटनाकडे; 168 जणांना कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यास मान्यता

रत्नागिरी:- पर्यटन मंत्रलायाच्या कृषी पर्यटन धोरणांतर्गत कोकण विभागात पर्यटन विभागाकडून आतापर्यंत 168 जणांना कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 23 प्रस्ताव मजूर करण्यात आले आहेत. यामुळे पर्यटन व्यावसायासासह तरुणांना रोजगारही मिळणार आहे.

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास साधणे, शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, कृषी पर्यटनाला कृषीपूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील लोककला आणि परंपरा यांचे दर्शन घडविणे, ग्रामीण महिला व तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शहरी भागातील लोकांना, विद्यार्थ्यांना शेती आणि शेती पद्धती तसेच कृषी संलग्न व्यवसायाची माहिती देणे, ग्रामीण भागातील राहणीमान उंचावणे, पर्यटकांना प्रदूषणमुक्त शांत व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद देणे, प्रत्यक्ष शेतातील कामाचा अनुभव देणे, शेतावरील कृषी मालाच्या प्राथमिक प्रक्रियेस प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील पडीक गायरान आणि क्षार जमिनी उपयोगात आणणे या उद्देशावर कृषी धोरण अवलंबून आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या विकासासाठी फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, मत्स्यव्यवसाय इत्यादी कृषी संलग्न विषयांचा एकत्रित विचार केल्यास कोकणातील ग्रामीण भागांसह किनारी भागात कृषी पर्यटनासह मत्स्य शेेतीलाही निश्चितपणे चालना मिळू शकते. शेतकर्‍यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे आणि शहरी पर्यटकांना शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळावा, यासाठी एक सुनियोजित व्यवस्था निर्माण करून पर्यटन विकास साध्य करण्यासाठी कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. यासाठी कोकणातील 256 संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यातील 243 संस्थांनी यासाठी निश्चित केलेल्या प्रस्तावातील प्रक्षेत्राला पर्यटन अधिकार्‍यांनी भेट देऊन फेर पडताळणीही केली. त्यापैकी 168 प्रस्तावंना मान्यता मिळाली आहे. त्यात ठाणे 27, पालघरमधील 38, रायगड 61, रत्नागिरी 23 आणि सिंधुदुर्ग 19 प्रस्तावांचा समावेश आहे.