जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पदाला लागलेले ग्रहण सुटता सुटेना

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सध्या सावळा गोंधळ सुरूच आहे. शिक्षणाधिकारीपदाला लागलेले ग्रहण सुटता सुटेना असे झाले आहे. हा संगीत खुर्चीचा खेळ अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शिक्षणाधिकारी पदाचा पदभार बुधवारी माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे. तीन महिन्यात चौथ्यांदा पदभार बदलण्यात आला आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उत्तम असला तरी शिक्षण विभागात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. रिक्त पदांमुळे अगोदरच शिक्षण विभाग बेजार झाला आहे. अधिकार्‍यांची संख्याही फारच कमी आहे. 9 तालुक्यांपैकी 7 तालुक्यांना गटशिक्षणाधिकारी नाही. तीन उपशिक्षणाधिकार्‍यांपैकी 2 जागा रिक्त आहेत तर गेले तीन महिने शिक्षणाधिकारी हे पद रिक्त असून, त्या पदासाठी संगीत खुर्चीचा खेळ सुरू झाला आहे.
मे अखेरीस शिक्षणाधिकारी वामन जगदाळे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी उषा शिरभाते यांच्याकडे शिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला. मात्र जेमतेम 20 ते 25 दिवसच हा पदभार त्यांच्याकडे होता. त्यानंतर हा पदभार काढून ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्याकडे देण्यात आला. यामुळे ग्रामपंचायतीतून शिक्षण विभागाचा कारभार हाकला जात होता. मात्र हासुद्धा घटकेपुरताच ठरला. महिनाभरात त्यांच्याकडूनसुद्धा हा पदभार काढून घेण्यात आला. हा पदभार रत्नागिरी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. आता 20 दिवसात पुन्हा त्यांच्याकडूनही हा पदभार काढून माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे. बुधवारी हा आदेश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांनी काढला आहे.

माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकरी सुवर्णा सावंत या काही वर्षापूर्वी रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी या पदावर कार्यरत होत्या. यामुळे त्यांना जिल्हा परिषदेची चांगली माहिती होती. असे असताना त्यांच्याकडे पदभार न देता तीन महिन्यात विविध अधिकार्‍यांकडे हा पदभार देण्यात आला. गेल्या तीन महिन्यात चार अधिकारी बदलल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळेतील मुलांनासुद्धा आपले शिक्षणाधिकारी कोण आहेत याचे उत्तर देताना विचार करावा लागत आहे. मुळात शिक्षकांनाच याचे उत्तर माहिती नसते. आतातरी हा पदभार काही महिने त्यांच्याकडेच राहील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.