रत्नागिरीतील जे. के. फाईल्स कंपनीला आजपासून टाळे

रत्नागिरी:- रत्नागिरीतील जे. के. फाईल्स कंपनीने अखेर शुक्रवारपासून गाशा गुंडाळला आहे. कामगार संघटनेच्या काही पदाधिकार्‍यांनी कंपनीसाठी पोषक भूमिका घेतल्याने, गुरुवार कंपनीचा शेवटचा दिवस ठरला. शुक्रवारपासून रत्नागिरीतील ही अभियांत्रिकी कंपनी बंद होणार हे निश्चित झाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कामगारांना जास्तीतजास्त मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केला. त्याचा काही अंशी परिणाम झाला असला तरी कंपनी मात्र बंद झाली आहे.

जे. के. फाईल्स कंपनीच्या उत्पादनाला मागणी घटल्याने ही कंपनी गेल्या जून महिन्यात बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. प्रथम कंत्राटी कामगारांना बाजूला करुन कायम स्वरुपी कामगारांना सात लाख रुपयांचा मोबदला देऊन ऐच्छिक निवृत्ती घेण्यासाठी प्रवृत्त केले जात होते. कामगारांनी बँकांकडून पाच ते दहा लाखापर्यंतची कर्ज घेतली आहेत. त्यामुळे सात लाख रुपयात त्यांची गैरसोयच होणार होती. त्यामुळे कायम कामगारांमधील नेत्यांची समिती नेमण्यात आली या समितीमधील पदाधिकार्‍यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. त्यानुसार पालकमंत्र्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले. यावेळेपासूनच कामगार संघटनेचे काही पदाधिकारी कंपनी व्यवस्थापनाला साथ देण्याच्या पवित्र्यात होते. याचा परिणाम म्हणून उद्योगमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. परंतु उद्योगमंत्र्यांनी कामगारांना पंधरा ते वीस लाख रुपयांचा मोबदला मिळालाच पाहिजे अशी ठाम भुमिका घेऊन पुन्हा कंपनी व्यवस्थापनाशी बैठक घेण्याचा विचार केला होता.

उद्योगमंत्र्यांची ही बैठक होण्यापूर्वीच नुकतीच कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांची कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा झाली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला नाही. याचाच परिणाम म्हणून राहिलेल्या कायम कामगारांना सात लाखांमध्ये एक ते दोन लाखांची वाढ करुन मोबदला देण्यावर समझोता झाला. त्यामुळे ही कंपनी शुक्रवारपासून बंद होणार असून, कामगारांची गुरुवारी शेवटची ड्युटी ठरली.