सणांच्या पार्श्वभूमीवर रनपकडून अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र

रत्नागिरी:- सणासुदीचे दिवस सुरू होत असल्याने रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर फळभाजींसह इतर वस्तू विकणार्‍या फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात वाहनांची वर्दळसुद्धा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या पथकाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. मंगळवारी अनेक फेरीवाल्यांचे वजनकाटे, फळे, फुले, जप्त करण्यात आले.

गुरुवारी गोकुळाष्टमी असून त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा उत्सवांची मालिका सुरु होत आहे. दहीकाला, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळविक्रेत्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील रस्त्यांवर पाहावे तेथे फळविक्रेते दिसत
आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोलकी विक्रेते व इतर सुशोभिकरणाच्या वस्तूही रस्त्यावर बसून विकल्या जात आहेत. काहींनी तर ही दुकाने थाटण्यासाठी शेडही बांधल्या आहेत. त्यामुळे शहर बकाल होऊ नये, यासाठी मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पथकाला केल्या. मालमत्ता विभागाचे अधिकारी नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण हटाव मोहीम पथकाने मंगळवारपासून शहरात कारवाई सुरू केली. या कारवाईत अनेक ठिकाणची फळे, फुले, वजनकाटे जप्त करण्यात आले.