शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा जि. प. सीईओंना घेराव 

रत्नागिरी:- तालुक्यातील कुरतडे ग्रामपंचायत आपल्याच गावच्या हद्दीतील बागपाटोळे भागाला पाणी देण्यास तयार असतानाही, तोणदे नळपाणी योजनेवरुन या गावाला काही अधिकार्‍यांनी पोलीस फौजफाटा घेऊन नळजोडणी करुन दिली आहे. त्यामुळे आधीच पाणी पुरवठा कमी होणार्‍या तोणदे ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, सोमवारी ग्रामस्थांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांसह सीईओंना याचा जाब विचारला. प्रशासनाने दोन दिवसात नवी जोडणी तोडली नाही तर ग्रामपंचायत ती तोडून टाकेल असा इशाराच देण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, माजी जि.प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे, उदय बने, माजी जि.प. सदस्य महेंद्र झापडेकर यांच्यासह किरण तोडणकर, तोणदे सरपंच शिला जाधव, उपसरपंच वैभव चव्हाण व तोणदे ग्रामस्थ मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेवर धडकले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी व पदाधिकार्‍यांनी ग्रामीण भागात वरिष्ठांना अंधारात ठेवून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी करीत असलेल्या कुरघोड्यांबद्दल जाब विचारला.

तोणदे ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेवरुन संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होत असतो, उन्हाळ्यात या विहीरीला कमी पाणी असल्याने, ग्रामस्थांनाच पाण्याचा तुटवडा पडत असतो. ही परिस्थिती माहित असतानाही ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍याने तोणदे नळपाणी पुरवठा योजनेवरुन जवळच्या कुरतडे गावच्या हद्दीतील बागपाटोळे भागातील घरांसाठी नळपाणी योजनेची पाईपलाईन टाकली. मुळात कुरतडे ग्रामपंचायतीने आपण या भागाला पाणी पुरवठा करण्यास सक्षम असल्याचे पत्रही संबंधित विभागाला दिलेले होते. त्यानंतरही संबंधित अधिकार्‍यांना पोलीस बळाचा वापर करीत तोणदे नळपाणी योजनेला बागपाटोळेचे पाईप लाईन जोडली. त्यामुळे आधीच कमी पाणी मिळणार्‍या गावातील ग्रामस्थांना मिळणार्‍या पाण्यावर आता परिणाम झाला आहे.

मुळात बागपाटोळे भागात तीन विहीरी असून पाटाचे पाणीही मिळते. त्यातही कुरतडे ग्रामपंचायत पाणी देण्यास तयार असताना, तोणदे नळपाणी योजनेवरुनच पाणी देण्याचा अट्टहास अधिकार्‍यांनी कुणाच्या सांगण्यावरुन चालवला आहे, असा प्रश्न ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमोर उपस्थित केला. ग्रामस्थांमध्ये वादाची ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

दोन दिवसात याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी निर्णय न घेतल्यास ग्रामपंचायत योग्य तो निर्णय घेईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी महिला तालुका संघटक साक्षी रावणंग, उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, तोणदेचे माजी सरपंच सचिन भोवड, देवेंद्र भाटकर, बंटी महाकाळ, भिमदास जाधव, संतोष सुर्वे, ओंकार सुर्वे, राकेश साळवी व पदाधिकारी उपस्थित होते.