शिक्षक दिनी शिक्षक समिती छेडणार सामूहिक किरकोळ रजा आंदोलन

रत्नागिरी:- विद्यार्थ्यांना शिकू द्या… शिक्षकांना शिकवू द्या… अशी शिक्षकांची मागणी आहे. मात्र शासनाच्या धोरणांमुळे तसे होत नाही. यासाठी हजारो शिक्षक ५ सप्टेंबरला किरकोळ रजेवर राहणार आहेत. शिक्षक दिनाच्या दिवशी किरकोळ रजेचे आंदोलन हे केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित नाही. शासनाने जर सकारात्मक भूमिका घेतली; तर शासनासोबत चर्चा करायला आम्ही केव्हाही तयार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे यांनी केले.

दापोली येथील श्री मंगल कार्यालयात झालेल्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य सल्लागार विजयकुमार पंडित, कोकण विभागीय अध्यक्ष बळीराम मोरे, राज्य कार्यकारणी सदस्य अंकुश गोफणे, रुपेश जाधव, मुश्ताक तांबे, प्रवीण काटकर, विलास जाधव यांच्यासह राज्य व जिल्हा कार्यकारिणी, तसेच सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षणाची होत असलेली आबाळ आपणा सर्वांना ज्ञात आहे. आम्ही गुणवत्ता पूर्ण दर्जेदार शिक्षणासाठी कटिबद्ध आहोत; परंतु वेगवेगळ्या उपद्रवी उपक्रमामुळे आणि शिक्षक- मुख्याध्यापकांना मागितल्या जाणाऱ्या माहितीमुळे संपूर्ण शिक्षक त्रस्त झाले आहेत. राज्यातील हजारो शाळेत आज शिक्षक नाहीत. विद्यार्थ्यांना बसण्या योग्य इमारती नाहीत. हजारो शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आसन पट्ट्या, डेस्क-बेंच देखील नाहीत. शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. अशा या विपरीत परिस्थितीत राज्यातील प्राथमिक शिक्षक कमालीचे वैतागले आहेत, अस्वस्थ आहेत. त्यांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी आणि शासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ने पुढाकार घेऊन शिक्षक दिनाच्या दिवशी सामूहिक किरकोळ रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात ११ ऑगस्टला शासनाला निवेदन दिले आहे. हे आंदोलन कोण्या एका शिक्षक संघटनेचे नसून संपूर्ण शिक्षकांच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती केवळ शिक्षकांच्या भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. इतरही संघटनांनी शासनाच्या धोरणाविरुद्ध आंदोलन करण्यास कुणीही अडवलेलं नाही. प्राथमिक शिक्षक समितीकडून शिक्षक दिनाच्या दिवशी हे आंदोलन होत आहे. याचा अर्थ शिक्षक समिती शिक्षक दिनाचे महत्त्व ओळखत नाही असा होत नाही. आम्ही आमच्या अस्मितेसाठी गौरव करण्याच्या दिवशी शासनाच्या धोरणाचा निषेध करत आहोत. काही संघटना स्वतः एकट्याने किंवा एकत्र येऊन कोणतेही आंदोलन करत नाही.‌ कोणती दुसरी संघटना आंदोलन करत असल्यास त्यात अडथळे आणण्याचा, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केविलवाणा सुरू आहे. शिक्षकांनी आपल्या अस्मितेसाठी आंदोलनात सहभाग घ्यावा.