भाट्ये खाडी, मांडवी बंदर गाळात रुतले

गाळ काढण्याची मच्छिमारांची मागणी

रत्नागिरी:- शहराजवळील भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात साचलेल्या गाळाची समस्या अधिक जटील होत चालली आहे. त्यामुळे येथील मच्छिमारांचे हाल कधी संपणार, असा प्रश्न मच्छिमारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

अनेक वर्षापूर्वी भाट्ये खाडीतील राजिवडा बंदर हे जिल्हयाचे महत्वाचे बंद होते. त्याचबरोबर भाट्ये खाडीमध्ये मोठमोठे मचवे, गलबते येत होती. मात्र, भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचल्याने त्या खाडीमध्ये ये‚ जा करण्यासाठी मच्छिमारांना भरती‚ओहोटीची प्रतिक्षा करावी लागते. गेल्या काही वर्षापासून गाळामुळे भाट्ये खाडी परिसरातील मच्छिमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा गाळ उपशाबाबत खाडी परिसरातील राजिवडा, कर्ला, भाट्ये, फणसोप या गावातील मच्छिमार संस्थांकडून शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांचा कालावधी लोटल्यावरही या गाळाच्या प्रश्नाकडे शासनाकडून गांभिर्याने पाहिले जात नसल्याची बाब राजिवडा येथील जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटीच्या लक्षात आली. या राजिवडा कोअर कमिटीने राजिवडा, कर्ला. भाट्ये आणि फणसोप या गावांची मच्छिमार संघर्ष समितीची स्थापना केली. आता ही मच्छिमार संघर्ष समिती गाळ उपशासाठी शासनाशी लढत आहे.

राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छिमार संघर्ष समितीने या गाळ उपशाचा प्रश्न उचलून धरला आहे. शासन दरबारी याबाबत अनेकदा निवेदने दिल्यानंतर आता या गाळाचा प्रश्न पावसाळ्यानंतर मार्गी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, या गाळाचा प्रश्न अधिक जटिल होत चालला असल्याने समुद्रात ये‚जा करण्याचा मार्गच बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मच्छिमारांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर मच्छिमार संघर्ष समितीकडून गाळ उपसा करण्याबाबत पाठपुरावा सुरुच ठेवण्यात आला आहे.

भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळ उपसण्याबाबत प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मच्छिमार संघर्ष समितीला दिले होते. हा गाळ उपसा करण्याचे काम ऑक्टोबर महिन्यापासून हाती घेण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी त्यावेळी मच्छिमारांसमोर स्पष्ट केले होते. या आश्वासनाच्या पुर्ततेकडे मच्छिमारांचे लक्ष लागून राहिले आहे.