रत्नागिरी पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर जात असताना अचानक छातीत दुखू लागल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि. 30 ऑगस्ट 2023) सकाळी सातच्या सुमारास घडली.

संभाजी दुर्गावळे( सातारा पाठण) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. रत्नागिरी पोलिस दलात कार्यरत असलेल्या दूर्गावले हे सध्या कशेळी ट्रॅफिक नेमणुकीस होते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर जात असताना अचानक ते खाली पडले. यानंतर, त्यांना डेरवण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दुर्गावळे यांच्यावर सातारा जिल्ह्यातील पाठणमधील त्यांच्या गारवडे या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ऐन राखी बंधनाच्या दिवशी हा दुर्दैवी प्रकार घडल्याने दूर्गावे कुटुंबीयासह रत्नागिरी पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.