चिपळूण:- ॲक्सिस बँकेचे खाते बंद होणार असल्याची भीती दाखवून चिपळुणातील खेर्डी एमआयडीसीमध्ये राहणाऱ्या एका अभियंत्याची सुमारे पाच लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. चिपळूण पोलिस स्थानकात मंगळवार, दि. २९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविकरण सीताराम पिंपळे (५०, रा. एमआयडीसी कॉलनी, खेर्डी, मूळ रा. दादर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पिंपळे यांना एका अज्ञाताचा फोन आला. त्याने फोनवरून तुमचे ॲक्सिस बँकेतील खाते बंद होण्याची शक्यता आहे, अशी भीती दाखवली. त्यानंतर व्हॉटस्अॅप मेसेज करून त्यांना एक ॲक्सिस बँक एपीके नावाची फाइल पाठवली. ही फाइल ओपन करून पॅनकार्ड अपडेट करा व एम पिन अपडेट करण्यास सांगितले. आपले बँकेतील खाते बंद होऊ नये, या भीतीने पिंपळे यांनी पॅन कार्ड व एमपिन अपडेट केले.
त्यानंतर त्यांच्या खात्यात असलेली १९,३८८ रुपये व मालवेअर ॲपमधून ४ लाख ९२ हजार ११५ रुपयांचे कर्ज घेऊन, या कर्जाची रक्कम पिंपळे यांच्या खात्यात आरोपीने जमा केली. त्यानंतर त्याने ४ लाख ८६ हजार ४९८ रुपये परस्पर दुसरीकडे वळवली. २५ हजार रुपये पिंपळे यांच्या खात्यात सिंग नामक या व्यक्तीने जमा केल्याचे दिसले. यामध्ये पिंपळेची ४ लाख ८६ हजार ४९८ रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दिली.