गावडेआंबेरेत मित्रांमधील वाद गेले टोकाला; मित्राकडून मित्रावर चाकूने वार

रत्नागिरी:- दोन मित्रांमध्ये सुरू असलेली चेष्टामस्करी विकोपाला गेल्याने त्यांच्यामध्ये वाद होऊन मित्रानेच मित्रावर चाकूने वार केल्याची घटना सांडमवाडी-गावडेआंबेरे येथे घडली. याप्रकरणी तरूणाविरूद्ध पूर्णगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश मंदार तिवरेकर (वय २३) व अक्षय अशोक हळदणकर (वय २५, दोघेही रा. सांडमवाडी, गावडेआंबेरे) हे दोघे मित्र असून रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गावडे आंबेरे एस्. टी. बस स्टॉपवर दोघे उभे होते. दोघांमध्ये चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असताना त्यांच्यात चेष्टामस्करी सुरू झाली. सुरूवातीला हसण्यावर चेष्टामस्करी नेण्यात आली. मात्र पुढे एका तरूणाच्या डोक्यात राग गेल्याने या रागाच्या भरात त्याने मित्रावरच हल्ला केला.

स्टॉपवर सुरू असलेली चेष्टामस्करी विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या अक्षय अशोक हळदणकर या तरूणाने प्रथमेश याच्या घरी जावून त्याच्यावर चाकूने काखेत वार केले. या हल्ल्यात प्रथमेश हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी प्रथमेश याने पूर्णगड पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अक्षय अशोक हळदणकर याच्याविरूद्ध भादंविक ३२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पो.हे.कॉ. पी. टी. कांबळे करीत आहेत.