महामार्गावर चार ठिकाणी मनसेची निषेध पदयात्रा

फलक, घोषणांचा पाऊस; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना लक्ष्य

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत सरकारला जाग आणण्यासाठी मनसेने खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि लांजा या ठिकाणी पदयात्रा काढली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज साहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणांनी रविवारी (ता. 27) सकाळी 7 वाजता महामार्ग दणाणून सोडण्यात आला. सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देताना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना लक्ष्य केले होते. मनसे कार्यकर्ते रत्नागिरी निवळी ते वांद्री अशी चौदा किलोमीटर अंतर चालत गेले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्यामुळे कोकणवासीयांसह बाहेरून येणार्‍या लोकांना मोठ्याप्रमाणात त्रास होत आहे. हे लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशी तिन जिल्ह्यात जागर पदयात्रा काढली. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

रविवारी सकाळी सात वाजता लांजा तहसील कार्यालय ते वेरळ अशी पायी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याचे मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांनी सांगितले. लांजा तहसील येथून ही पदयात्रा बाहेर पडली. महामार्गावरून वेरळ गावापर्यंत मनसे कार्यकर्ते शासनाच्या विरोधातील फलक, घोषणा देत चालले. मनसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी लांजा शहर परिसर दणाणून सोडण्यात आला. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे प्रवासी, कोकणवासीय आणि पर्यटक यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आजवर या महामार्गावर प्रवास करणार्‍या अनेकांना प्राण गमावावे लागले. त्यामुळे लोकशाही पद्धतीने याचा निषेध करून सरकारला जाग आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. रत्नागिरी तालुक्यात निवळी ते वांद्री अशी 14 किलोमीटरची पदयात्रा मनोज चव्हाण, संदिप देशपांडे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष रुपेश सावंत, छोटू खामकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. चिपळूणात बहाद्दूरशेख नाक्यापासून तर खेड येथे परशुराम घाट ते पाग नाका अशी पदायात्रा काढली गेली. खेडमध्ये वैभव खेडेकर यांनी नेतृत्व केले होते. यात्रेमध्ये सहभागी मनसे नेते संदिप देशपांडे म्हणाले, जागर यात्रेचा एक टप्पा आपण पूर्ण केला आहे. या माध्यमातून सरकारला संदेश देण्यात आला आहे. महामार्गाची काय दुरवस्था झाली ते या पदयात्रेतून पहालया मिळाली आहे. काही ठिकाणी रस्त्यात पूर्ण खड्ड्याचा पॅच आहे, तो कधीच दुरुस्त केलेला नाही. त्याकडे पहायला कोणाला वेळ नाही. त्यासाठीच ही जागर यात्रा आहे. आज आम्ही सत्तेत नाही, पण उदया आमची सत्ता नक्कीच येईल. सतरा वर्षे झाली, तरीही सिंगल लेन पूर्ण होत नाही. गणपतीपर्यंत सिंगल लेन होईल असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण सांगत आहेत. हे करणे म्हणजे सरकारने कोकणच्या जनतेवर उपकार केलेले नाहीत. तिन्ही जिल्ह्यातील खासदार, आमदार याविषयावर पुढे येत नाहीत. आता बदल अटळ आहे. राज ठाकरे यांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवा.
दरम्यान, महामार्गावर पदयात्रा काढत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, चारही ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. यात्रेबरोबर पोलिसांच्या गाड्याही ठेवण्यात आलेल्या होत्या. तसेच अधिकारी मनसैनिकांच्या संपर्कात राहून आंदोलन शांततेत व्हावे यासाठी कार्यरत होते.