सर्व एसटी बसेसची देखभाल, दुरुस्ती पूर्ण क्षमतेने

विभाग नियंत्रक बोरसे ; प्रवाशानो निर्धास्त प्रवास करा

रत्नागिरी:- एसटी महामंडळाच्या अभियांत्रिकी खात्याकडील पंचसुत्री तत्त्वानुसार कार्यपद्धतीचा अवलंब व परीक्षण करूनच प्रत्येक बस मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येते. प्रवाशांना सुखकर व सुरक्षित सेवा देण्यासाठी राज्य परिवहन रत्नागिरी विभाग व महामंडळ सदैव कटिबद्ध आहे. कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता एसटी महामंडळाच्या बसमधून सुरक्षित प्रवास करा, असे आवाहन विभाग नियंत्रक बोरसे यांनी केले.

राज्य परिवहन महामंडळ देवरूख आगाराचे चालक अमित सुधाकर आपटे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःचा व्हिडिओ तयार केले. या व्हिडिओमध्ये प्रवासी जनतेला थेट प्रवास करू नये. आपला जीव वाचवा, असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने विभागीय पातळीवर तातडीने चौकशी समिती गठित करण्यात आलेली आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच संबंधित एकूण जबाबदार सर्व कर्मचाऱ्यांवर खातेनिहाय कारवाई करण्यात येईल, असा खुलासाही विभाग नियंत्रक बोरसे यांनी केला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीने रत्नागिरी विभागातील सर्व बसेसची देखभाल दुरुस्ती, स्वच्छता पूर्ण क्षमतेने करण्यात येते. प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. प्रवाशांची सुरक्षा महत्वाची आहे; परंतु अशा प्रकारच्या व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एसटी विभागाने आपला खुलासा केला आहे. प्रवाशांनी आणि विविध समाजघटकांनी तसेच प्रसारमाध्यमांनी महामंडळाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता एसटी महामंडळाच्या बसमधून सुरक्षित प्रवास करा, असे आवाहन बोरसे यांनी केले आहे.