गुहागर:- गुहागर तालुक्यात ग्रामीण भागातील ३६ वर्षीय तरुण कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. त्यानंतर त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू होती. बेपत्ता झालेल्या या तरुणाचा मृतदेह सात दिवसांनी थेट जंगलात झाडाला टांगलेल्या स्थितीत दिसल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला. कोणतेही व्यसन नसलेल्या आणि मोलमजुरी करून आपला संसार चालवणाऱ्या या तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर तालुक्यातील वडद डफळेवाडी येथील राजाराम उर्फ राजु भाग्या जोगळे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राजाराम घरातून कोणालाही न सांगता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रात्री नऊ वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. तेव्हापासून त्याची शोधाशोध सगळीकडे सुरू होती. त्याचा ठावठिकाणा कुणीकडेच लागला नव्हता. अखेर १७ ऑगस्ट रोजी गुहागर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
गुहागर पोलिसांकडूनही त्याचा शोध सुरू होता. तसेच गावातील आणि वाडीतील ग्रामस्थही त्याचा शोध घेत त्याचा ठावठिकाणा लागतो का यासाठी प्रयत्न करत होते. राजाराम उर्फ राजु भाग्या जोगळे याचे चार-पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरी पत्नी आणि तो असे दोघांचे कुटुंब होते. या दुर्दैवी घटनेने त्याची पत्नी, नातेवाईकांना आणि गावातील ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.