वरूण राजाची कृपा; शीळ धरण वाहतेय ओसंडून

रत्नागिरी:- ऑगस्ट महिन्यातील गेल्या 20 दिवसात तुरळक पाऊस पडला तरी रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण अजूनही ओसंडून वाहत आहे. धरणाजवळ असलेले जंगल क्षेत्र आणि बागायतींमुळे धरणातील झरे अजूनही पूर्ण क्षमतेने प्रवाहित असल्यानेच आजही धरण ओव्हरफ्लोच आहे असे रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

रत्नागिरी शहराला शीळ धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या 4 जुलै रोजी हे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी धरणाची पाणी पातळी 120.33 मीटर इतकी होती तर पाण्याचा विसर्ग 1.01 घनमीटर प्रतिसेकंद इतका होता. तरीही धरण ओसंडून वाहत आहे. धरणाजवळ जंगल क्षेत्र आहे. त्याचबरोबर आंबा, काजू, फणस यासह अनेक फळांच्या बागायती आहेत. त्यामुळे जंगल आणि बागायती झाडांमुळे पावसाचे पडणारे पाणी धरून ठेवले जाते. पाऊस कमी होतो तसा ते पाणी झाडांच्या मूळांकडून हळुहळू सोडले जाते. त्यामुळे धरणातील झर्‍यांचा प्रवाहसुद्धा आहे तितक्याच वेगाने सुरू असतो हा अनुभव असल्याचे पाणी विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.
ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाच्या जोरदार सरी पडलेल्या नाहीत. तरीसुद्धा दि. 4 जुलै रोजी धरणाच्या सांडव्यावरून जसे पाणी वाहत होते, तसे आजही वाहत असल्याचे पाणी विभागाच्या अधिकार्‍यानी सांगितले. धरणातील पाण्याची ही पातळी पाऊस पडला किंवा नाही पडला तरी अशीच राहते, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.