नीलिमा चव्हाण मृत्यु प्रकरण; प्रोजेक्ट अधिकारी संग्राम गायकवाडच्या कोठडीत वाढ

दापोली:- नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडिया मधील प्रोजेक्ट अधिकारी संग्राम गायकवाड या अधिकाऱ्यावर अटकेची कारवाई झाली. पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या या संशयित आरोपीला दापोली न्यायालयात शनिवारी पुन्हा हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संशयित आरोपीला दोन दिवसांची वाढीव पोलीस कस्टडी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान नीलिमा चव्हाण हिने युट्युब सोशल मीडियावर केलेल्या सर्चिंगची मोठी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यामध्ये तिने नैराश्यातूनच जीवन संपवण्याचा मार्ग, काय केल्याने जीवावर बेतू शकते, जीवनात यशस्वी होण्याची कला अशा स्वरूपाचं काही सर्च केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. २२ जुलैपासून तिने हे सर्चिंग केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. नीलिमा चव्हाण यांचा मोबाईल व बॅग जगबुडी नदीत चार ते पाच दिवस पोलिसांनी सर्च ऑपरेशन करूनही या दोन्ही वस्तू मिळाल्या नाहीत. त्यामुळे नीलिमा चव्हाण हिच्या गुगल अकाउंट वरून पोलीस तपासात ही मोठी माहिती समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

या प्रकरणात निलिमा काम करत असलेल्या स्टेट बँकेतील अधिकारीच दबाव टाकत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले अशी तक्रार तिच्या वडिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा परिषद जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पाचपुते करत आहेत.