जिल्ह्यामध्ये एकूण 56 ठिकाणी कृषी योजना मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी:- स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. 18 ते 24 ऑगस्ट या कालावधीत कृषी योजना मेळावा सप्ताह राबवण्यात येत आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण 56 ठिकाणी कृषी योजना मेळावे होणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुर्‍हाडे यांनी दिली.

पीएम किसान अंतर्गत ज्या शेतकर्‍यांची अद्यापही ई केवायसी व बँक खात्याला आधार सीडिंग पूर्ण झालेले नाही, अशा शेतकर्‍यांनी या मेळाव्यात आपला आधार कार्ड, आधार कार्डला संलग्न असलेला मोबाईल व बँकेचे पासबुक घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता का मिळत नाही, याबाबत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात येईल. एनपीसीआय मॅपिंग होत नसेल किंवा लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि ईकेवायसी पूर्ण झाले, तरीही पीएम सन्मान निधीचा हप्ता मिळत नसल्यास पोस्टामध्ये खाते उघडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनाबाबत सविस्तर माहिती येणार असून, अर्ज करण्याची प्रक्रिया, त्याकरिता आवश्यक दस्तऐवज, अनुदानाचे स्वरुप व अनुषंंगिक बाबी, संबंधित कार्यक्षेत्रामध्ये लागवड होणार्‍या प्रमुख पिकांचे लागवड तंत्रज्ञान, पिकांच्या महत्त्वपूर्ण वाढीच्या अवस्थेत येणार्‍या कीड व रोग व त्यांचे नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुर्‍हाडे यांनी सांगितले.