रत्नागिरी:- बँकेची तसेच जनतेच्या मोठ्या रकमेची फसवणूक करण्याच्या उददेशाने एल.आय.सी मुल्यवान रोख्यांच्या कागदपत्रांचे बनावटीकरण व फेरफार करणार्या चार जणांची न्यायालयाने गुरुवारी जामिनावर मुक्तता केली. तर त्यांच्या एका साथिदाराला 19 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. फसवणूकीची ही घटना 8 जून ते 26 ज्ाून 2023 या कालावधीत एस.व्ही.सी बँकेत घडली होती.
अभिजित दिलीप जाधव (30, कोहीनुर काँप्लेक्स, रत्नागिरी),संजय आत्माराम सुर्वे (53, रा.अंधेरी पूर्व, मुंबई),अरुण रामचंद्र शिंदे (55, रा.बोरीवली, मुंबई) अजित रामानंद राव (54, रा.कांदिवली, मुंबई) या चार जणांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. तर त्यांचा साथिदार विल्सन पिटर नाडार (रा.अंधेरी, मुंबई) याला न्यायालयाने 19 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्या विरोधात गणेश रावसाहेब पाटील (39) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार,या 5 जणांनी बँकेची तसेच जनतेच्या मोठ्या रकमेची फसवणूक करण्याच्या उददेशाने एल.आय.सी मुल्यवान रोख्यांच्या कागदपत्रांचे बनावटीकरण व फेरफार करुन ती कागदपत्रे खरी आहेत असे भासवून एस.व्ही.सी बँकेची फसवणूक केली.त्यांच्या विरोधात भादंवि कायदा कलम 406, 420, 465, 467, 468, 471, 511, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.