हर्णे नवानगर येथे समुद्रकिनारी सापडली चरसची पाकिटे

दापोली:- तालुक्यातील हर्णे नवानगर येथे समुद्रकिनारी चरस या उत्तेजक द्रव्याची आठ पाकिटे सापडली असून त्याचे वजन अंदाजे 8 किलो आहे. दापोली पोलिसांच्या किनाऱ्यावरील गस्ती दरम्यान ही पाकिटे सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुरुड समुद्रकिनारी सोमवार 14 ऑगस्ट रोजी चारासाची 15 पाकिटे समुद्रकिनारी असलेल्या केवडयाच्या बनात आढळून आली होती, त्यानंतर दापोली पोलिसांनी परिसरातील समुद्रकिनारी आणखी काही पाकिटे समुद्रातून वाहून आली असल्याची शक्यता लक्षात घेऊन समुद्रकिनाऱ्यावर तपासणीची मोहीम राबविली, या मोहिमेत हर्णे नवानगर परिसरात बुधवारी 8 चरसाची पाकिटे पथकाला सापडली असून त्याचा पंचनामा करून ती जप्त करण्यात आली आहेत. पुढील काही दिवस ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी दिली आहे. गुजरात समुद्रकिनारीही अश्याच प्रकारची चरसाची पाकिटे आढळून आली असून समुद्रातील गस्ती पथकाच्या कारवाईला घाबरून ही चरसाची पाकिटे समुद्रात टाकून दिली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.