निवळी येथील अपघात प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई – गोवा महामार्गावरील निवळी येथे झालेल्या अपघात प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात कारला धडक दिल्यानंतर टँकर ४० फूट खोल दरीत कोसळला होता. टँकरमधील कागदपत्रांवरील नावावरुन त्याच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंतकुमार जगन्नाथ मेघवाल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टँकर चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात अमोल शिवाजी काटे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी ते आपल्या ताब्यातील रेनॉल्ट टी वर्ग कार (एमएच- ०५ एएन-८९८३) घेऊन निवळी येथून जात होते. त्याच सुमारास संशयित टँकर चालक हा आपल्या ताब्यातील टँकर (आरजे २० जीबी – ७२९६) घेऊन मागून येत होता. त्याचा टँकरवरील ताबा सुटल्याने त्याने फिर्यादीच्या कारला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यानंतर टँकर थेट बाजुच्या ४० फूट खोल दरीत पडून हा अपघात झाला.

याप्रकरणी फरार टँकर चालकाविरोधात भा. दं. वि. कायदा कलम २७९, २८६ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.