जिल्ह्यात ३७ प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र कार्यान्वित

रत्नागिरी:- शेतकर्‍यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा व मार्गदर्शन, नवीन योजना याबाबतची माहिती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र जिल्ह्यात सुरू केली आहेत. जिल्ह्यात एकूण 37 केंद्रे कार्यरत आहेत.

शेतकर्‍यांना आवश्यक शेतीचे साहित्य, कृषी निविष्ठा, नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित शेतीविषयक माहितीचे आदानप्रदान, त्यांच्या मालाची सुरक्षितता, पाश्चात्य देशात विकसित होत असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी जागरूकता, मार्गदर्शन, दळणवळणाच्या पुरेशा सोयीसुविधा याची माहिती प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रात मिळत आहे. जिल्ह्यात 37 केंद्रे असली तरी केंद्राची संख्या वाढविण्यासाठी मागणी होत आहे.
शेतकर्‍यांसाठी आवश्यक सुविधा, शेतीसाठी बी-बियाणे, खतांची उपलब्धता, लागवडीबाबत मार्गदर्शन, शासकीय योजना, अनुदानाबाबत माहिती एकाच छताखाली समृद्धी केंद्रा’द्वारे उपलब्ध झाली आहे.

डिजिटल बोर्डद्वारे माहिती पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रात साहित्यासाठी रॅक, अनुदान व किंमत दर्शविणारे डिजिटल बोर्ड, डिजिटल व्यवहारासाठी मशीन, बारकोड स्कंनर, मालाची उपलब्धता, अनुदान, किंमत याचीही माहिती उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात 37 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे सुरू करण्यात आली असून, जिल्ह्याचा विस्तार पाहता समृद्धी केंद्राच्या संख्येत वाढ होणे आवश्यक आहे. केंद्रात टीव्हीद्वारे योजनांची माहिती सतत सुरू असतेे. सामुदायिक सेवा केंद्र, माती परीक्षण, बियाणे चाचणी, नमुना संकलन, शेतीची अवजारे फवारणीसाठी ड्रोन समृद्धी केंद्रात एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. तसेच खते, बियाणांवर जादा दर आकारून शेतकर्‍यांची होणार्‍या लुबाडणुकीला आळा बसणार असून, शेतमालाला योग्य भाव मिळेल. खते, बियाणांवरील सबसिडीची माहिती मिळणार आहे. लागवडीपूर्व व पश्चात मशागत, खत, पाणी व्यवस्थापन, बियाणे, खते निवड, लागवडीची पद्धत याची माहिती मिळणार आहे. शेतकर्‍यांना फायदेशीर असलेल्या विविध योजना त्याचा फायदा कळविण्यासह सहभाग वाढविण्याबाबत मार्गदर्शन तज्ञांव्दारे उपलब्ध होत आहे.

.