संचित रजेवरील आरोपी मोईन काझी फरार; पोलीस स्थानकात गुन्हा दाखल 

रत्नागिरी:- पैशाच्या व्यवहारातून ठेकेदाराचा रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला व सध्या संचित रजेवर कारागृहातून बाहेर आलेला आरोपी मोईन काझी कारागृहात हजर न होता पसार झाल्याने त्याच्याविरोधात शहर पोलीस स्थानकात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० ऑगस्ट २०१५ मध्ये पोमेंडी बुद्रुक येथील धनावडेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे पुलाजवळ हा खून झाला होता. 

अभिजित शिवाजी पाटणकर (वय २५, रा. शिवाजीनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव होते. मोईन महमद युसुफ काझी उर्फ मोईन उर्फ रॉनी ब्रिगेंझा उर्फ हेमंत शहा (वय २९, आशियाना मंझिल- कुवारबाव), फुजेल अहमदमिया काझी (वय २०, रा. मजगाव), रियाज हुसेन नदाफ ( वय २०, रा. कोकणनगर-अजमेरीनगर), आसीफ कलीम खान (वय २४, रा. पुरीआचार्य, पो. तेजगड, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) मोईन महमद युसुफ काझी व मृत अभिजित पाटणकर मित्र होते.लोकांना वेगवेगळी काम करून देतो, परदेशी मोबाईल, वस्तू घेऊन देतो, असे सांगून लोकांकडून पैसे घेत असे. यातील साक्षीदार वैभव मंगलदास भोजने यांच्याकडून मृत व काझी यांनी परदेशातील मोबाईल देतो, असे सांगून पैसे घेतले होते. या पैशातील वाटा आरोपीला न दिल्याने आरोपी मोईन काझी याने आरोपी फुजेल काझी, रियाज नदाफ, आसिफ खान यांच्याशी संगनमत करून दुचाकीवरुन शासकीय तंत्रनिकेतन येथे नेले. मोईन काझी याने अभिजितला दुचाकीवर घेऊन पोमेंडी ब्रुदूक येथील रेल्वे पुलाखाली नेले.पैशाच्या वाट्यावरून दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि मोईन काझी याने गावठी रिव्हॉल्व्हरने अभिजित पाटणकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. त्यात तो जागीच ठार झाला होता.

या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होऊन येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. अभिजित पाटणकर खून प्रकरणात न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेप व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैद. अशी शिक्षा सुनावली होती.कोल्हापूर येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मोईन काझी हा ८जुलै 2023 रोजी २८ दिवसांच्या संचित रजेवर कारागृहातून बाहेर आला होता. ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता तो कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात हजर होणार होता मात्र तो हजर न होता पसार झाल्याने त्याच्याविरुद्ध शहर पोलीस स्थानकात भा. द. वि. क. २२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध शहर पोलीस घेत आहेत.