निवळी घाटात टँकर उलटून महामार्ग ठप्प

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात एलपी गॅस वाहतूक करणारा टँकर दुपारी 2 वाजता उलटल्याने महामार्ग ठप्प झाला होता. दोन-अडीच तासाच्या प्रयत्नानंतर एकेरी वाहतूक प्रशासनाने सुरु केली आहे. टँकर गॅसने भरलेल्या असल्याने तज्ज्ञाच्या मदतीनंतर तो बाजूला केला जाणार आहे.

शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गोवा येथून मुंबईच्या दिशेने जाणारा टँकर निवळी घाटात उलटला. टँकरची टाकी रस्त्यात आडवी पडल्याने संपूर्ण महामार्ग दुपारी 2 नंतर बंद पडला होता. पोलीस व अग्नीशमक दलाने पाहणी करुन, गॅस लिकेज होत नसल्याचे लक्षात आल्यावर या भागातून एकेरी वाहतूक महामार्गावर सुरु करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती.

गॅस टाकी बाजूला करताना अपघात होऊ नये यासाठी जिंदल कंपनीतील तज्ज्ञांना प्रशासनाने पाचारण केले होते. सायंकाळी उशिरा ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रात्रीपर्यंत टँकर बाजूला करण्याचे काम सुरु होते. पोलीस व प्रशासनाने दुर्घटना घडू नये यासाठी क्रेन व अन्य साहित्य या ठिकाणी तैनात केले होते.