कर्मचाऱ्यांचा पगार रखडला; जिल्ह्यातील एसटी बॅंक कर्मचारी संपावर

रत्नागिरी:- एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील नवीन सत्ताधारी आल्यानंतर बदललेल्या धोरणामुळे राज्यातील एसटी बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी संप गुरुवारपासून सुरू केला आहे. मात्र त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पगार काढता आलेला नाही. एटीएम सुविधा सुरू झाली असली तरी अजूनही अनेकांनी एटीएम कार्ड घेतले नसल्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जुनमध्ये एसटी बॅंकेच्या निवडणुकीत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने सर्व १९ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी एसटी बॅंकेतील जुन्या धोरणांत बदल करण्याचे ठरवले. यानुसार बॅंकेत कार्यरत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचारी भरती करण्याचे ठरवले. तसेच सर्व सभा ऑनलाइन घेण्यास सुरवात केली. बॅंकेचे पदसिद्ध अध्यक्ष एसटीचे महाव्यवस्थापक असतात; परंतु त्यांनी व अन्य एक अधिकारी या ऑनलाइन बैठकीस उपस्थित राहिलेले नाहीत. एसटी बॅंकेच्या ५० शाखा राज्यभरात सुरू आहेत. यात लिपिक, शिपाई वगैर मिळून ६०० कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी संपावर गेल्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार मिळणे कठीण झाले आहे.

कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार झालेला आहे. संपाबाबत कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही; परंतु कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यास त्यांना महामंडळाकडून रोख स्वरूपात पगार देण्याकरिता पावले उचलली जातील. या संदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.