रत्नागिरीच्या हायटेक बसस्थानकाचा ठेकाच रद्द

रत्नागिरी:- रखडलेल्या रत्नागिरी हायटेक एसटी बसस्थानकासंदर्भात धक्कादायक महिती पुढे आली आहे. ठेकेदार काम करण्यास तयार नसल्याने त्याच्यावर कारवाई म्हणून त्याचा ठेकाच रद्द करण्यात आला आहे. त्याची देणी पूर्ण करून लवकरच फेरनिविदा काढून नवीन ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे. सहा वर्षांमध्ये बांधकामाची किंमत वाढल्याने १० कोटीऐवजी १४ कोटीचा हा प्रस्ताव मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या मुख्य स्थापत्य अभियंता विद्या बिलारकर यांनी दिली.

सुरवातीला बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या बीओटी तत्त्वावर या बसस्थानकाचे काम करण्यात येणार होते. एसटी महामंडळानेच यामध्ये पुढाकार घेऊन महामंडळातर्फे राज्यातील ७१ एसटी बसस्थानके बांधण्याचा निर्णय झाला. रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे हे काम १० कोटीचे आहे; परंतु एसटी बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या हायटेक प्रकल्पाच्या बांधकामाला कोरोनाचा फटका बसला. त्यानंतर रेंगाळलेल्या या कामाला अजूनही गती मिळालेली नाही. हायटेक बसस्थानकाचा 10 कोटीच्या या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन तत्कालीन पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांसमोर झाले. आराखड्यामध्ये काही त्रुटी निघाल्या होत्या. शॉपिंग सेंटर किंवा व्यापारी गाळे आत ठेवण्याऐवजी दर्शनीभागी उभारून एसटी आत आणि बाहेर जाण्यासाठी मार्ग करण्याचे सुचवण्यात आले आहे. त्यानुसार नवीन आराखडा करून प्रकल्पाच्या कामाचा आरंभ करण्यात आला.
२०१८ मध्ये या कामाला सुरवात झाली. कोल्हापूरच्या ठेकेदाराला याचा ठेका देण्यात आला. सुरवातीला काम चांगल्या पद्धतीने सुरू होते. परंतु त्यानंतर ते रेंगाळले ते अजून तसेच आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. उन्हात, पावसात बसस्थानकाच्या समोरच्या थांब्यावर उघड्यावर थांबावे लागते. सुरवातीला एका भेळधारकाने एसटीच्या या जागेबाबत न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे दीड वर्षे या कामाला स्थगिती होती. त्यानंतर कोरोना काळातही हे काम रखडले. त्यामुळे १० कोटीच्या या कामाबाबत ठेकेदाराने वाढीव रकमेची मागणी केली होती. त्याला वाढीव रक्कम देण्यास शासन तयार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. आता एमएयडीसीकडून निधी घेऊन एसटी बसस्थानकाचे काम करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले होते. आतापर्यंत १ कोटी ७५ लाखाचे काम झाले असून, ठेकेदाराचे अजूनही ६० लाखाचे देणे आहे. एसटी महामंडळाने काम सुरू करण्याबाबत त्याच्याकडे तगादा लावला; परंतु ठेकेदार काम करण्यास तयार नसल्याने त्याच्यावर एसटी महामंडळाने कारवाई केली करून त्याचा ठेकाच रद्द केला आहे.