पुढील वर्षभरात 10 हजार कोटींचा रत्नागिरीत प्रकल्प: ना. सामंत

एमआयडीच्या 61 व्या वर्धापन दिन साजरा

रत्नागिरी:- मागील दोन-तीन वर्षात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीत मागे पडला होता. परंतु वर्षभरात राज्यात 1 लाख 18 हजार 422 कोटींची परदेशी गुंतवणूक झाली आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा देेशात नंबर एकवर असून, एमआयडीसीच्या पुढील वर्धापन दिनापयर्र्त रत्नागिरीत 10 हजार कोटींचा प्रकल्प येईल असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरी एमआयडीसीतील टीआरपी परिसरात आयोजित एमआयडीसीच्या 61व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, उपअभियंता बी. एन. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख योगेश पंडीत, तालुकाप्रमुख बाबू म्हाप व पदाधिकारी उपस्थित होते.
सत्तांतरानंतर गेल्या वर्षभरात राज्यातील उद्योगक्षेत्रामधील गुंतवणूक वाढत आहे. महाराष्ट्र आता प्रथम क्रमांकावर आले आहे. एमआयडीसी व उद्योग विभागातील अधिकारी व कर्मचारी चांगले काम करीत आहेत. पुढील वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरीत 10 हजार कोटींचा प्रकल्प असेल, त्यासाठीही अधिकार्‍यांनी चांगले काम करा अशी अपेक्षा ना. सामंत यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनात गतवर्षी उद्योगाची गाडी सुसाट धावली आहे. यात एमआयडीसीच्या कर्मचार्‍यांचाही मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. दावोस येथे झालेल्या करारांपैकी अनेक उद्योगांना जागा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावषींपासून राज्यात उद्योग विभागातर्फे विविध पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी उद्योग विभागाचा पहिला पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एक उद्योजक व पहिला उद्योजिकेचाही गौरव केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बारसूमध्येही अनेक कर्मचारी व अधिकार्‍यांनी चांगले काम केल्याबद्दल ना. सामंत यांनी त्यांचे कौतुक केले. एमआयडीसीसाठी अनेक ग्रामस्थांच्या जमिनींचे संपादन होत असते, त्यामुळे एमआयडीसीच्या जागेवर उद्योग येताना, उद्योजकांनी स्थानिकांनाही प्राधान्य द्यायला हवे, असे स्पष्ट मत ना. सामंत यांनी व्यक्त केले. यावेळी एमआयडीसीमध्ये कायम झालेल्या कर्मचार्‍यांनी ना. सामंत यांचा सत्कार केला. तर शैक्षणिक परीक्षेत उत्तम गुण मिळवणार्‍या कर्मचार्‍यांच्या मुलांचा ना. सामंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. चार दिवसापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी टँकरचा अपघात झाला होता, या टँकरमधून गॅस लिकेज होत होता, त्यावेळी एमआयडीसीच्या अग्नीशमन सेवेतील कर्मचार्‍यांनी आपला जीव धोक्यात घालून गॅस दुसर्‍या टँकरमध्ये भरुन महामार्गावरील संभाव्य मोठा अपघात टाळला होता. या कर्मचार्‍यांचाही गौरव यावेळी करण्यात आला. यावेळी उद्योजक संस्थेचे प्रतिनिधी के.बी. भट, राजेंद्र सावंत, दिगंबर मगदूम आदी उपस्थित होते.