दरड प्रवण क्षेत्रासाठी 945 कोटींचा प्रस्ताव: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्र व पूर येणार्‍या भागाचे पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना तलाठी व सर्कल यांना देण्यात आल्याअसून प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंती उभारल्या जाणार असून दरड प्रवण क्षेत्रासाठी 945 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी दिली. दरड प्रवण क्षेत्रातील 12 गावे अतिसंवेदनशील असून तेथील लोकांचे प्राधान्याने स्थलांतर केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकणीं व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की जिल्ह्यात दरड प्रवण क्षेत्रातील गावांची संख्या 181 असून त्यांची चार टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. यात 12 गावे धोकादायक असून तेथील 100 टक्के लोकांचे स्थलांतर केले जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात 12 गावे तर तिसर्‍या टप्प्यात 79 तर चौथ्या टप्प्यात 46 गावांचा समावेश करण्यात आला आहे. पूरप्रवण क्षेत्रात 50 गावे असून दोन्ही मिळून 601 कुटुंबातील जवळपास 2 हजार 178 लोकांचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन केले जाईल असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. सध्या यातील नव्वद टक्केहून अधिक लोक नातेवाईकांकडे रवाना झाले असून दहा टक्के लोकांची व्थवस्था प्रशासनाने केली आहे.
पावसाचा जोर कायम असून, येथील परिस्थिती अवगत करण्यासाठी कोकण आयुक्तांनी तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित केली होती. यावेळी 181 गावांचे प्रत्यक्ष सर्व्हेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले. नातूवाडी येथील मोरेवाडीमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याने चार कुटुंबातील दहाजणांचे स्थलांंतर करण्यात आले आहे. जिल्ह्य़ात मुचकुंदी नदी सोडली तर सर्व नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात 1 जूनपासून पडलेल्या पावसात तब्बल 1 कोटी 35 लाखाचे नुकसान झाले आहे. यामध्ये 182 अंशतः घरांचे 68 लाखाचे, 34 गोठ्यांचे 17 लाखाचे नुकसान झाले आहे. तर राजापूर येथे 1 व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याला शासनाकडुन 4 लाखाची मदत देण्यात आली आहे. तर तीन जखमी असून त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविण्यात आले. जिल्ह्यातील 2 अंगणवाड्या, 16 शाळा, 56 साकवांची नुकसान झाले असून त्यांची दुरूस्ती करण्याची गरज आहे, असे श्री. सिंह यांनी सांगितले.