लाल दिव्याच्या गाडीतून विद्यार्थी अधिकारी होऊन येतील तो आनंदाचा क्षण: आ. साळवी

रत्नागिरी:- रत्नागिरीत गुणवंत विद्यार्थ्यांची खाण असून, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु युपीएसी, एमपीएससीच्या माध्यमातून जेव्हा येथील विद्यार्थी अधिकारी होऊन लाल दिव्यांच्या गाडीतून फिरतील तो आमच्यासाठी आनंदाचा दिवस असेल असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार व उपनेते राजन साळवी यांनी केले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांसाठी जी मदत लागेल ती करण्यास शिवसेना कटिबध्द असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक वर्गाची उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला आ. साळवी यांच्यासह सहसंपर्कप्रमुख राजू महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, उदय बने, जयसिंग घोसाळे, शेखर घोसाळे, महेंद्र झापडेकर, प्रमोद शेरे, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, महिला संघटक ममता जोशी, तालुका संघटक साक्षी रावणंग, मनिषा बामणे, संध्या कोसुंबकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना मुलांनी जास्तीत अभ्यास करावा व रत्नागिरीचे नाव मोठे करावे असे आवाहन केले. तर राजू महाडीक यांनी शिवसेना ठाकरे पक्षातर्फे बाळासाहेबांच्या नावाने युपीएससी परीक्षेसाठी अ‍ॅकॅडमी सुरु करण्यात आली असून याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके, मार्गदर्शक देण्याची जबाबदारी ही आमची असल्याचे महाडीक यांनी स्पष्ट केले. जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करताना त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना आ. राजन साळवी म्हणाले की, कोकण बोर्ड स्थापन झाल्यापासून दहावी व बारावीमध्ये पहिले येत आहे. त्यामुळे कोकणात गुणवंतांची खाण असल्याचे सिध्द झाले आहे. परंतु येथील विद्यार्थ्यांनी फक्त डॉक्टर, इंजिनिअर व शिक्षकच न बनता अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जिल्ह्यात येणारे वरिष्ठ अधिकारी हे परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील असतात, त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. ज्यावेळी स्थानिक विद्यार्थी याठिकाणी अधिकारी म्हणून येईल, त्याच्या गाडीवर लाल दिवा असेल तोच आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असेल असा विश्वास आ. साळवी यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.