चिपळुणात पूर ओसरला; तरीही प्रशासन अलर्ट मोडवर

चिपळूण:- आभाळ फाटल्यागत मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसाचा जोर बुधवारपर्यंत कायम होता. वाशिष्ठीसह शिवनदीने इशारा पातळी ओलांडली होती. यामुळे चिपळुणात पूर परिस्थिती निर्माण निर्माण झाली होती. परंतु, बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने चिपळुणात पूर ओसरल्याचे पहावयास मिळाले. मात्र, या सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे दिसून आले. प्रशासनाच्या अलर्टतेबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, कान्हे येथे घराजवळ दरड कोसळल्याने ३ कुटुंबातील १६ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे बुधवारी चिपळूण शहर, खेर्डी परिसरात पुराचे पाणी शिरले होते. एकंदरीत सर्वत्र जलमय परिस्थिती पहावयास मिळाली. पर्यायाने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर कधी कमी होईल? याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. बुधवारी संध्याकाळी पावसाचा जोर कमी झाला होता. परंतु, प्रशासन अलर्ट मोडवर होते. प्रांताधिकारी आकाश लिंगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. संपूर्ण शहर परिसरात पूरस्थितीची पाहणी केली. एनडीआरएफचे पथक सोबत होते. एकंदरीत बुधवारी रात्री उशिरापर्यंत देखील प्रशासन अलर्ट मोडवर होते. पावसाचा जोर कमी झाल्याने वशिष्ठी नदीची पातळी ४.२२ मी म्हणजेच इशारा पातळीच्या खाली गेली. यामुळे शहरात सध्या कोणत्याही ठिकाणी पाणी नाही. पोफळी, कोळकेवाडी, चिपळूण या परिसरात पहाटे ५ पासून पाऊस बंद झाला. बुधवारी सकाळी चिपळूण शहरातील एका कुटुंबातील (शिंदे) ३ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले होते. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने सायंकाळी ५ वाजता १६ व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. बुधवारी दुपारी मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले. ते सर्वजण आपल्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतरीत झालेले आहेत. बुधवारी सायंकाळी कान्हे येथे घराजवळ दरड कोसळल्याने ३ कुटुंबातील १६ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. कुंभार्ली घाटात वाहतूक सुरळीत सुरू आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे. परशुराम घाटात दुहेरी वाहतूक सुरळीत सुरू आहे. परशुराम घाटात लाईटची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशाने दि. २० जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये यांना सुट्टी देण्यात आली. चिपळूण शहरातील सर्व ट्रान्सफॅार्मर चालू केले आहेत व विद्युत पुरवठा पूर्ववत चालू झाला आहे. पूर परिस्थितीमुळे चिपळूण शहरात काही ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पहावयास मिळाले. ही स्वच्छता मोहीम चिपळूण नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी हाती घेतली आहे.

चिपळूण बचाव समिती व नागरिकांच्या लढ्याला यश येऊन जलसंपदा विभाग व नाम फाउंडेशन मार्फत यावर्षी वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यातील काम मार्गी लागल्याने त्याचा सकारात्मक परिणाम यावर्षीच्या अतिवृष्टीच्या काळात दिसून आला आहे. नद्यांची वाहन क्षमता वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शहरात शिरले नाही, अशी प्रतिक्रिया नाम फाउंडेशनचे चिपळूण समन्वयक महेंद्र कासेकर यांनी दिली.