खेडमधील पूरस्थिती पूर्ववत; बंद झालेले रस्ते, संपर्क तुटलेल्या गावात दळणवळण

रत्नागिरी:- पूर परिस्थितीमुळे खेडमधील बंद झालेले रस्ते, संपर्क तुटलेल्या गावात दळणवळण सुरु झाल्याने परिस्थिती पूर्ववत झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विषयक कामांचे सनियंत्रण व सर्व संबधित विभागांशी समन्वय साधण्यासाठी पाच नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

मुसळधार पावसामुळे खेड-दापोली, भोस्ते-अलसुरे, चिंचघर ते बहिरवली जाणारा रस्ता हे मार्ग संपर्क तुटलेले होते. परंतु, ते आता पूर्ववत झालेले आहेत. त्याशिवाय तळवट खेड- तळवट जावळी, खेड-शिर्शी (देवणा पूल), शिव मोहल्ला ते शिव खुर्द (बौध्दवाडी क्र.१) हे रस्ते पूर्ववत सुरु झाले असून आंबवली बाऊलवाडी रस्त्यावर दरड हटवण्याचे काम सुरु होते.
शिरगाव (बागवाडी), शिरगाव (पिंपळवाडी), शिरगाव (फोंडवाडी), शिरगाव (धनगरवाडी), अलसुरे मोहल्ला या संपर्क तुटलेल्या गावात व वाडयांमध्ये दळणवळण सरु झाले आहे.

खेडमधील 103 कुटुंबातील 380 जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. दरडप्रवण पोसरे खुर्द (बौध्दवाडी), पोसरे (सडेवाडी), साखर (बामणवाडी), मुसाड, बिरमणी गावातील एकूण 14 कुटुंबातील 47 जणांना स्थलांतरीत केले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची व दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपत्ती व्यवस्थापन विषयक कामांचे सनियंत्रण व सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधण्यासाठी खेडसाठी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, राजापूरसाठी उपजिल्हाधिकारी (पुनवर्सन) एम.बी. बोरकर, चिपळूणसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता छाया नाईक यांची, संगमेश्वरसाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर यांची तर दापोलीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.