दापोली:- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करीत दापोली येथील साई रिसॉर्ट जप्त केले आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्टवर बुधवारी टाच आणली. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही जप्तीची कारवाई करण्यात आली. सीरआरझेड कायद्याचे उल्लंघन करून या रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप आहे. रिसॉर्टच्या बांधकामासाठी मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने हायकोर्टात या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.
माजी मंत्री अनिल परब यांची साई रिसॉर्टच्या संदर्भात गेल्या काही महिन्यांत ईडीने अनेकवेळा बोलावून चौकशी केली होती. कोस्टल रेग्युलेशन झोनच्या नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधले गेल्याचा आरोप करण्यात आला होता.
साई रिसॉर्टचे बांधकाम सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आले असून यात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. मागील दीड-दोन वर्षांपासून ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. या प्रकरणी सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. हे रिसॉर्ट अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता तर अनिल परब यांनी आरोप फेटाळून लावताना आपला या साई रिसॉर्टशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या मालकीचे हे साई रिसॉर्ट आहे. या प्रकरणी अनिल परब यांना तूर्तास हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण आहे तर सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे.
अनिल परब यांच्या विरोधात आरोप नाही
साई रिसॉर्ट प्रकरणी जयराम देशपांडे व सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. तसेच सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश आहे. या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असून भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची ईडीला मुभा आहे. सध्या ६ जणांविरुद्ध आरोप आहे. मात्र, अनिल परब यांच्या विरोधात कोणताही आरोप नाही. मात्र, याचे सूत्रधार अनिल परब असल्याचे ईडीने म्हटले आहे.