दापोली तालुक्यातील उसगाव येथे दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर

दापोली:- भारती शिपयार्ड या जहाज बांधणीच्या क्षेत्रातील कंपनीमुळे प्रकाशझोतात आलेल्या दापोली तालुक्यातील उसगाव या गावात सध्या दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर प्रचंड वाढला आहे. बिबट्याकडून राजरोसपणे पाळीव प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या हल्ल्यात बिचाऱ्या मुक्या प्राण्यांचा हकनाक बळी जात आहे.

आपल्या जीवापलिकडे सांभाळलेल्या पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांच्या या प्रकाराने उसगावातील रहिवाशांमध्ये बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

दापोली तालुक्यातील उसगाव येथील रहिवासी असलेल्या विठ्ठल बाबू टेमकर यांच्या बकरीला ठार मारल्याचे समाधान होत नाही तोच लक्ष्मण सोनू दवंडे यांच्या वासरावरही बिबट्याने त्याच दिवशी दिवसाढवळ्या हल्ला करून वासराला ठार केले. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याच्या भितीने गावातील रहिवाशांना शेतीच्या कामासाठी घराबाहेर पडून आपल्या शिवारात जाण्यास भीती वाटत आहे. या घटनेचा वन विभागाकडून रितसर पंचनामा करण्यात आला आहे. दापोलीचे वनपाल साताप्पा सावंत, वनरक्षक जगताप यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली.