परिस्थितीवर मात कशी करायची! संगमेश्वरच्या दिशा उंडे, शुभम घाग यांच्याकडून शिका

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गोठणे पुनर्वसनमध्ये झोपडीत राहून दिशा उंडे, शुभम घाग हे दोन विद्यार्थी पाचवीच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले आहेत. मेहनतीच्या जोरावर आलेल्या अडचणींवर मात करत या दोघांनाही यश मिळवले आहे.

शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, गुणवत्ता यादीत दोन विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे. या परीक्षेत गोठणे पुनर्वसन शाळेमधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. शाळेचा निकालही 100 टक्के लागला आहे. जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या गोठणे हे गाव चांदोली अभयारण्यात गेल्यामुळे या गावाचे पुनर्वसन काही वर्षांपूर्वी तालुक्यातील हातिव येथे करण्यात आले. गेली अनेक वर्षे पुनर्वसन झालेले असतानाही शासनाने त्यांना म्हणाव्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. अजूनही पक्की घरे बनवण्यात आलेली नाहीत. झोपडीतच ही कुटुंबे राहत आहेत. पक्की घरे नसल्यामुळे या कुटुंबांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. या कुटुंबातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शाळेतील शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने या मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत आहे. झोपडीत राहूनच संघर्ष करत या मुलांना अभ्यास करावा लागतो. शाळेतील दिशा तुकाराम मुंडे व शुभम दीपक घाग यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक रमेश जयराम शिवगण यांच्यासह मुख्याध्यापक रेश्मा यादव, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, युगंधरा सुर्वे, प्रज्ञा पवार यांचे मार्गदर्शन लाभले.