चालक मद्यपान करून आढळल्यास परवाना होणार जागेवरच रद्द

रत्नागिरी:- समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागामार्फत खासगी बस तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यांतर्गत दारू पिऊन गाडी चालविणारा चालक आढळल्यास त्याचा परवाना जागेवरच रद्द करण्यात येणार असून, त्याला देशात कुठेही नवीन परवाना काढता येणार नाही.

भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी बसमालकांची गुरुवारी पुण्यात बैठक झाली. याप्रसंगी पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, बस अँड कार ओनर्स असोशिएसनचे अध्यक्ष राजन जुनवणे, बाळासाहेब खेडेकर, बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष किरण देसाई व राज्यातील विविध भागांतून आलेले खासगी बसमालक, संचालक उपस्थित होते.

भोर म्हणाले, सर्वाधिक अपघात दारू पिऊन गाडी चालविणे, वेग मर्यादेचे पालन न करणे, गाडीची देखभाल-दुरुस्ती न करणे, यामुळे होत असतात. यासंदर्भातील आदेश आम्हाला वरिष्ठ पातळीवरून मिळालेले आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भातील कारवाई होणार असून, यात चालकाचा परवाना निलंबित होणार आहे. तसेच, नवीन चालक येईपर्यंत गाडी जप्त केली जाणार
आहे.