सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरतीचा कडाडून विरोध

रत्नागिरी:- शिक्षकांच्या रिक्त पद विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत; मात्र या निर्णयाला पवित्र पोर्टलमधून नियुक्ती वाट पाहणार्‍या उमेदवारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

जि.प. शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नियोजित शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकांमुळे ती प्रक्रियेस उशीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, जि.प., नगरपालिका, महानगर पालिका व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या 15 दिवसांत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांसह सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यानी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत आ आदेशात नमूद करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी हे आदेश काढले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया शिक्षण आयुक्तांच्या नियंत्रणाखाली पूर्ण केली जाणार असल्याने आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र यामुळे पवित्र पोर्टलमधून नियुक्ती होण्याची वाट पाहणार्या उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे.
डीएड, बीएड असणार्या लाखो उमेदवारांचा रोजगार हिरावून घेणारा आणि प्राथमिक शिक्षण उद्ध्वस्त करणारा हा निर्णय असल्याचे मत अनेक उमेदवारांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा वर्गावर पाठविल्यास त्यांची शिकविण्याची मानसिकता आहे का? बदललेला अभ्यासक्रम त्यांना कळणार का? वृद्धापकाळामुळे शरीर साथ देणार का? हे प्रश्न आहेत.