मॅग्नेट प्रकल्पात कोकणातील आंबा, काजूचा समोवश

सहा कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान शक्य

रत्नागिरी:- महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांकडून मॅग्नेट प्रकल्पात कोकणातील आंबा, काजूचाही समोवश करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी गट, कंपनी, प्रभाग संघ यांना अनुदानावर आधारीत प्रक्रिया उद्योग, अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करणे शक्य होणार आहे. यामध्ये सहा कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे.

शेतकर्‍यांना भांडवल आणि कमी वित्तपुरवठ्याअभावी उत्पादनामध्ये सुधारणा करण्यास मर्यादा असतात. तर उत्पादित शेतीमालाला मूल्यवर्धना अभावी चांगली बाजारपेठ आणि दर मिळत नाही, ही बाब लक्षात घेऊन राज्यात महाराष्ट्र ग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) आशियायी विकास बँकेच्या सहकार्याने तसेच सहकार व पणन विभाग आणि स्वतंत्र मॅग्नेट सोसायटीद्वारे सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रकल्पाद्वारे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करणे, फलोत्पादन व फूल पिकांची गुणवत्ता तसेच उत्पादन वाढवणे, साठवणूक तसेच प्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा उभारणी प्रकल्पांचा समावेश आहे. शेतीमाल हाताळणी यंत्रणा, प्रशीतगृह, शीतगृह, रायपनिंग चेंबर, रेफर व्हॅन, फळे व भाजीपाला सुकविण्यासाठी यंत्रणा, दुय्यम प्रक्रिया यंत्रणा, आयक्यूएफ व फोझन यंत्रणा, किरकोळ विक्रीसाठी पायाभूत सुविधा आदीसाठी अनुदान मिळणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी महिला द्वारे कार्यान्वित शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाचे तीनशे उपप्रकल्प असून यापैकी 20 टक्के प्रकल्प हे महिला, दिव्यांग व्यक्ती व दुर्बल घटकांच्यासाठी राखीव आहेत.

सुरुवातीला केळी, पेरु, चिक्कू, भेंडी, मिरची (हिरवी / लाल), पडवळ, डाळिंब, सिताफळ, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी ही फळपिके आणि फुलपिके समाविष्ट होती. यामध्ये आंबा, काजू पिकांचाही समावेश केला आहे. उपप्रकल्पांसाठी कोकणातील बागायतदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. याची माहिती मॅग्नेट प्रकल्पाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. इच्छुक अर्जदारांनी मॅग्नेट प्रकल्प व कृषि पणन मंडळाच्या संकेतस्थळावरूह अर्ज व कागदपत्रांची यादी डाऊनलोड करावयाची आहे. अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांसह रत्नागिरीतील पणनच्या विभागिय आणि वाशी येथील कार्यालयात 10 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करा, असे आवाहन मॅग्नेट प्रकल्प संचालकांनी केले आहे.


चौकट

हे लाभार्थी आहेत पात्र

लाभार्थ्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, जीवनोन्नती अभियानांतर्गत प्रोत्साहित प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक कंपनी आणि फेडरेशन्स, मुल्यसाखळी गुंतवणुकदार यांचा समावेश आहे. यामध्ये उत्पादक संस्था व मुल्यसाखळी गुंतवणुकदारांसाठी पहिल्या 70 लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांना पात्र प्रकल्प खर्चाच्या अधिकतम 60 टक्केपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे.