जिल्ह्यातील तीन मध्यम धरणे, 46 लघु प्रकल्पांमधील पाणी साठ्यात वाढ

रत्नागिरी:- गेल्या आठवड्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर पाणलोट क्षेत्रातील सातत्याने होणारे पर्जन्यमान यामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील जलसंचयात वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. धरण क्षेत्रातही या काळात चांगला पाऊस पडला असून तीन मध्यम धरणे आणि 46 लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.

यंदा पावसाने नागरिकांना जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रतीक्षा करायला लावली. पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने जिल्ह्यात अनेक दुर्गम भागात पाणीटंचाईची समस्या उद्भवली. काही ठिकाणी एक दिवस आड तर काही ठिकाणी दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला.

शहरानजीक असलेल्या नाचणे, कुवारबाव, मिरजोळे आदी ग्रामपंचायतींनीही एक दिवसाआड पाणी पुरवठा केला होता. त्यामुळे अनेक भागात पाण्याचे टँकर धावू लागले. उष्णतेने पाण्याचे स्रोत आटल्याने धरणातील पाणीसाठा पाऊस पडेपर्यंत पुरेल की नाही, अशी भीती निर्माण झाली.

जून महिन्याच्या शेवटी आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पाऊस सुरू झाला. जुलै महिना सुरू होताच पाऊस चांगलाच पडू लागल्याने जिल्ह्यातील तीन मध्यम धरणे आणि 46 लघुप्रकल्पांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. तर 46 लघुप्रकल्प आहेत. तीन मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण पाणीसाठा 182 दशलक्ष मीटर आहे. मध्यम व लघुप्रकल्पांमध्ये एकूण 412 दशलक्ष घनमीटर साठा आहे.
रत्नागिरी तालुक्यात नातूवाडी (ता. खेड), गडनदी (ता. संगमेश्वर) आणि अर्जुना (ता. राजापूर) हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. या तीन प्रकल्पांमध्ये मिळून सध्या 81.67 टक्के पाणीसाठा आहे. तर 46 लघुप्रकल्पांमध्ये 62.78 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 10 जुलै रोजी या तीनही धरणांमध्ये यंदापेक्षा पाणीसाठा कमी होता.

हर्णै येथील खेम धरणातील पाणीसाठा हा दरवर्षी डिसेंबर ते जानेवारीदरम्यान आटतो. त्यामुळे येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा हा बंद पडतो; खेम धरण परिसराला पावसाळ्यात पर्यटनस्थळाचे स्वरूप येते. दररोज या ठिकाणी अनेक नागरिक पावसाळी पर्यटनासाठी येतात.