तिर्थक्षेत्र गणपतीपुळे दत्तक घ्या; उद्धव ठाकरे यांच्याकडे थेट मागणी

रत्नागिरी:- असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव गणपती देवस्थानचा विकास होऊन भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी गणपतीपुळे परिसर दत्तक घ्यावा असे निवेदन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना गणपतीपुळेतील शिवसैनिकांनी दिले.

मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन गणपतीपुळेतील शिवसैनिकांनी पर्यटनस्थळावरील दुरवस्थेबाबत साकडे घातले. शिवसैनिकांनी श्री क्षेत्र गणपतीपुळे यांची प्रतिमा भेट दिली. या वेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे, उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, रोहित साळवी, आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यासाठी गणपतीपुळेचे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे यांनी नियोजन केले होते. शिवसैनिकांनी मुंबईत जाऊन मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेतले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी गणपतीपुळे येथे येऊन देवस्थान व परिसराच्या विकासासाठी 102 कोटी रुपयांच्या विकासकामांची भूमिपूजन केली. त्यांनी फक्त भूमिपूजन करून न थांबताच त्या कामाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्याचे आदेश दिले होते. मात्र मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही सर्व कामे ठप्प झाली आहेत. गणपतीपुळे येथे दररोज महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून लोक येतात, पण सुविधेअभावी नाराजी व्यक्त करतात. अनेक कामे मार्गी लागली होती. कुणाच्या तरी अति हव्यासापोटी आपले सरकार गेले आणि ही सर्व कामे ठप्प झाली आहेत. महाराष्ट्रात फिरताना लोककल्याणकारी कामांना आपण प्राधान्य देत लोकांना नवी उभारी देत आहात. त्याप्रमाणेच गणपतीपुळे देवस्थान व परिसराचा विकास व्हावा आणि गणपतीपुळे देवस्थानच्या चरणी लीन होण्यासाठी गणपतीपुळे दत्तक घ्यावे.