जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर 10 हजार 215 हेक्टरवर भात लावण्या पूर्ण

रत्नागिरी:- मोसमी पावसाची सुरवात उशिरा झाल्यामुळे भात लावण्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. आठ दिवस समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पुन्हा उघडिप दिल्यामुळे जिल्ह्यातील लावण्यांचा वेग मंदावणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर 10 हजार 215 हेक्टरवर भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत.

मागील आठ दिवसांच्या तुलनेत मंगळवारी आणि बुधवारी (ता. 12) जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. 24 जुनपासून मोसमी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सलग पाऊस पडत होता. गेल्या दोन दिवसात पावसाने उघडीप घेतली आहे. मोसमी पाऊस लांबल्यामुळे पेरण्या उशिराने झाल्या. त्यामुळे भात लावण्यांचे वेळापत्रक पुढे सरकले आहे. जुन महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यात पेरण्या केलेल्या काही ठिकाणी पुरेशी रुजवातच झालेली नाही. आता पुन्हा दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पेरणीनंतर कमी कालावधीत तयार झालेली रोपं लावणीसाठी वापरावी लागणार आहेत. जुलैचा पहिला आठवडा पूर्ण झाला तरीही लावण्यांच्या कामाला वेग आलेला नाही.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 215 हेक्टरवर भात लावण्या पूर्ण झाल्या असून तुलनेत 15 टक्के लावण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात 68 हजार 088 हेक्टरवर लागवड केली जाते. उशिरा आलेल्या पावसामुळे पेरण्या जुनच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु होत्या. सर्वसाधारणपणे 7 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. तसेच खरीपातील अन्य पिकांमधील 10 हजार 398 हेक्टरपैकी 514 हेक्टरवर लावगवड झाली आहे. 4.95 टक्के लावगड झाली आहे.

सलग दोन दिवस जोर ओसरलेलाच!

मंगळवारी जिल्ह्यात चोविस तासात सरासरी 3.87 मिलीमीटर पाऊस झाला होता. बुधवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात 3.56 मिमी नोंद झाली होती. त्यात मंडणगड 3, दापोली 9, खेड 7, गुहागर 1, चिपळूण 1, रत्नागिरी 1, लांजा 5, राजापूर 5 मिमी पाऊस नोंदला गेला. तर संगमेश्‍वर तालुक्यात पाऊस झालेला नाही. सलग दोन दिवस जिल्ह्यात दिवसा उन पडलेले होते.