घरफोडी, जबरी चोरीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

रत्नागिरी:- शहरातील एका प्रसिध्द हॉटेलमध्ये घरफोडी व जबरी चोरी केल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेल्या आरोपीची मे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये घडलेल्या या घटनेमध्ये संशयित आरोपीला त्याचवेळी अटक करण्यात आली होती. हॉटेल मालकाने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीवर भा.द.वि.कलम ३८०, ४५४, ४५७, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

या गुन्हयाचे कामी संशयित आरोपी आलमगीर शफीक वागळे याला अटक करण्यात आली होती. सदर आरोपीस अन्य गुन्हयाचे कामी शिक्षा झाली होती. सबब आरोपीला न्यायबंदी म्हणून रत्नागिरी विशेष कारागृहात ठेवून केसची कामकाज चालविण्यात आले.

सदर आरोपीस खाजगी वकील करणे शक्य नसल्याने त्याने विधी सेवा प्राधिकरणाकडे त्याची बाजू कोर्टासमाेर मांडण्यासाठी वकील मिळणेसाठी अर्ज केला होता. त्याचे अर्जाप्रमाणे सदर आरोपीस विधी सेवा प्राधिकरणामार्फत चालविण्यात येणा-या लोकअभिरक्षक कार्यालयाकडून वकील देण्यात आले. लोकअभिरक्षक कार्यालय रत्नागिरी चे सहाय्यक विधी सेवा सल्लागार वकील यतिन अनिल धुरत यांनी सदर आरोपीची बाजू मे. कोर्टासमोर परिणामकारकरित्या मांडली. वकील श्री. यतिन अनिल धुरत यांनी केसचे कामी घेतलेले उलटतपास व केलेला युक्तिवाद ग्राहय धरुन मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. माणिकाराव सातव यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या कामी त्यांना लोकअभिरक्षक कार्यालय, रत्नागिरीचे उपमुख्य लोकअभिरक्षक वकील श्री. अजित वायकुळ यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्याच कार्यालयाचे सहाय्यक लोकअभिरक्षक वकील श्रीम. आयुधा अक्षय देसाई व वकील श्रीम. पल्लवी परशुराम धोत्रे यांनी माेलाचे सहाय्य केले.

मे. सर्वोच्च न्यायालय व मे. उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी पारीत केलेल्या आदेशांप्रमाणे रत्नागिरी जिल्हा न्यायालयात विधी सेवा प्राधिकरण मार्फत लोक अभिरक्षक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. सदर कार्यालयामार्फत कोणत्याही आरोपीला कोणताही भेदभाव न करता, मोफत विधी सहाय्य दिले जाते. सदयस्थितीत लोकअभिरक्षक कार्यालयामार्फत उपमुख्य विधी सेवा सल्लागार वकील श्री. अजित वायकुळ, तसेच सहाय्यक लोकअभिरक्षक विधी सेवा सल्लागार वकील. श्रीम. आयुधा देसाई, वकील श्रीम. पल्लवी धोत्रेे, वकील श्री. यतिन धुरत हे आरोपींची बाजू मे. न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडण्याचे काम करत आहे.