जिल्ह्यातील 104 ग्रामपंचायत इमारती बनल्या धोकादायक

रत्नागिरी:- जिल्ह्यातील 104 ग्रामपंचायती इमारती सध्या धोकादायक बनल्या आहेत. याठिकाणी ग्रामसेवक, कर्मचारी यांना जीव मुठीत धरून दैनंदिन काम करण्याचा गाडा हाकावा लागत आहे. धोकादायक ग्रामपंचायतींच्या इमारतींची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती हे तीन स्तर आहेत. त्यामध्ये सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा स्तर म्हणजे ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींना ग्रामविकासाचा गाडा हाकला जातो. या ग्रामपंचायतींमार्फत वाडी-वस्त्यांवर विविध योजना राबवल्या जात आहेत. दरवर्षी कोट्यवधी रूपयांच्या आराखड्यातून विविध विकासकामे केली जात आहेत. मात्र ज्या इमारतींमधून हा आराखडा केला जातो त्या इमारतीच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

जिल्ह्यातील 104 ग्रामपंचायतींच्या इमारतींची अवस्था बिकट बनली आहे. अनेक वर्षांपासून या इमारती नुसती दुरूस्ती करून वरूनच मलम लावला जात आहे. या इमारती वापरामुळे अधिकच धोकादायक असल्याचा निष्कर्ष बांधकाम विभागाने काढला आहे. काही ग्रामपंचायतींच्या इमारतींचे छत गळत आहे. काहींच्या भिंतींना तडे गेले आहेत. काहींना खिडक्या, दरवाजे नादुरूस्त झाले आहेत. यामुळे या नादुरूस्त इमारतींमधूनच गाव विकासाचा गाडा हाकला जात आहे.

काही ग्रामपंचायतींमध्ये तर इमारतीला गळती लागली असल्याने पावसाळ्यात जुनी कागदपत्रे भिजत आहेत. यामुळे या ग्रामपंचायती अडचणीत आल्या आहेत. या ग्रामपंचायतींनी नव्या इमारतीसाठी मागणी केली आहे. मात्र निधी नसल्याचे कारण सांगत शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.