जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; अतिवृष्‍टीमुळे जनजीवन विस्‍कळीत

रत्नागिरी:- संपूर्ण जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शुक्रवारी पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरी गुरुवारी रात्री पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने नद्या नाल्याना पुर आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी जगबुडी नदी धोक्याच्या पातळी बाहेर वहात होती. जगबुडी नदीची धोक्याची पातळी सात मीटर वर असून सायंकाळी पाण्याची पातळी ७.२५ मीटर इतकी होती. खेड शहरानजीक वाहणाऱ्या या नदीला पूर आल्याने किनाऱ्यावरील बंदर रोड पाण्याखाली गेला. पुराचे पाणी पालिकेच्या मटण-मच्छी मार्केट येथून बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाल्याने नागरीक धास्तावले आहेत. अतिवृष्टी सुरूच असल्याने प्रशासन पूरपरिस्थिती उद्भवल्यास सामोरे जाण्यासाठी सतर्क झाले आहे.

गुरुवारी दि.६ रोजी सकाळी ८ ते शुक्रवारी दि.७ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत चोवीस तासात खेडमध्ये ६४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण ६९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी ११ वाजता जगबुडी नदीने ६.७५ मीटर पातळी गाठल्यानंतर प्रशासन सतर्क झाले होते. नदी किनाऱ्यावरील गावातील नागरिकांना तसेच खेड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना धोक्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला. अतिवृष्टीची परिस्थिती पाहता शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचता यावे म्हणून नियोजित वेळे पूर्वीच पालकांसोबत संपर्क साधून घरी पाठवले.

खेड शहर जगबुडी नदी व नारिंगी नदी किनारी वसलेले असून, या नद्यांना येणाऱ्या पुराचा फटका खेड बाजारपेठेला बसतो. सकाळी १२ वाजल्यापासून जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी पालिकेच्या मटण – मच्छी मार्केट परिसरातून बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाली आहे. तर नारिंगी नदीला आलेल्या पुराचे पाणी शहरातील नाना – नानी पार्क जवळून खेड – दापोली मार्गावर येण्यास सुरुवात झाली आहे. अतिवृष्टी सुरूच असून, मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात देखील नागरीक भयभीत झाले आहेत. नदी किनाऱ्यावर बहुतांश भातशेती असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील चोरद, नारिंगी, सोनपात्रा इत्यादी उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्याने नुकत्याच करण्यात आलेल्या लावणीचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

खेड तालुक्यातील नातुवाडी धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ११५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, एकूण १२१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या धरणात १३.०५९ दशलक्ष घन मीटर एव्हढा पाणीसाठा झाला आहे. धरण ४७.९६ टक्के भरले असून, अतिवृष्टीमुळे त्यात वेगाने वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.