मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमणाला मंत्र्यांकडून अभय

रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदराच्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करणाऱ्या ३५० जणांना मत्स्यविभागाने नोटीस बजावल्या आहेत. पावसाळा संपण्यापूर्वी ही अनधिकृत कच्ची आणि पक्की बांधकामे हटवण्यात यावीत, अशी नोटीस बजावली आहे; परंतु स्थानिक मच्छीमार मंत्री उदय सामंत यांना भेटल्यानंतर त्यांनी या कारवाईला स्थगिती दिली आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्त तांत्रिक तथा अभिनिर्णय अधिकारी रत्नाकर राजम यांनी याला दुजोरा दिला.

मिरकरवाडा बंदर हे मत्स्यबंदर म्हणून विकसित केले जात आहे; मात्र या बंदराच्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. अनेक कच्ची, पक्की बांधकामे आणि शेड उभारण्यात आल्या आहेत. मत्स्यविभागाच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत जागेवरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याने अनधिकृत बांधकामे आजही वाढत आहेत. आता मत्स्यविभागाने कठोर पावले उचलली असून अतिक्रमण केल्या ३५० जणांना नोटीस बजावली आहे. ही बांधकामे पावसाळा संपण्यापूर्वी हटवण्यास यावीत, असे स्पष्ट केले आहे. मत्स्य विभागाच्या या कारवाईमुळे काही मच्छीमारांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यांनी कारवाई करण्यात येऊ नये, आम्हाला मच्छीमारी करताना विविध साहित्य, इंधन, जाळी किंवा अन्य वस्तू ठेवण्यास जागा नाही म्हणून या कच्च्या शेडमध्ये आम्ही साहित्य ठेवतो, असे म्हणणे मांडले. त्याचा विचार करून मंत्री सामंत यांनी या कारवाईला स्थगिती दिली आहे. यापूर्वी देखील मत्स्य विभागाने नोटीस बजावून अतिक्रमण हटवण्यास सांगितले होते. तेव्हा देखील सामंत धावून आले होते. त्यांच्या प्रयत्नामुळे दोनवेळा मच्छीमारांवरील ही कारवाई टळली आहे. तत्कालीन प्रांताधिकारी फरोग मुकादन यांनी पोलिस बंदोबस्तात पहिल्यांदा अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली होती; मात्र पुन्हा ती उभारण्यात आली आहेत.