पटवर्धन हायस्कूलमध्ये कोकणातील पहिली इंटरॅक्टिव्ह रूम

रत्नागिरी:- नवीन शैक्षणिक धोरणात इंटरॅक्टिव्ह रूमचा समावेश आहे. त्यानुसार पटवर्धन हायस्कूलमध्ये कोकणातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह रूमचे उद्घाटन करण्यात आले. आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या रूमचा पुरेपूर उपयोग गुणवत्तावाढीसाठी करा. उपक्रमशील व कौशल्याधारित शिक्षणामुळे मुले नक्कीच यशस्वी होतील, असे प्रतिपादन कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले.

आ. म्हात्रे यांनी नुकतीच पटवर्धन हायस्कूलला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह सुनील वणजू यांनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, माजी मुख्याध्यापक विजय वाघमारे उपस्थित होते. म्हात्रे म्हणाले, मी अलिकडेच लंडनला गेलो होतो. तिथे वर्गात बोर्ड नव्हते टीव्ही स्क्रिन होता. मुले घोळक्याने शिकत होती. शिक्षकाने कमी बोलायचे आणि ॲक्टिव्हिटी बेस शिक्षण द्यायचे. सर्व दप्तरेही शाळेतच असतात. कौशल्यावर आधारित शिक्षण दिले जाते. आपल्या नवीन शैक्षणिक धोरणात याचा समावेश आहे.

सुनील वणजू यांनी सांगितले, इंटरॅक्टिव्ह रूम कोकणात प्रथमच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आमदार म्हात्रे आमच्या कायम पाठीशी असल्याने शासकीय कामे त्यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होतात. संस्थेने आता ६ कोटीचा मोठा प्रकल्प हाती घेतला असून, त्याकरिता आमदार व सीएसआर फंडांतून निधी द्यावा. या प्रसंगी म्हात्रे यांच्यासमवेत विजय पाटील, विलास कोळेकर, राजेश जाधव, लतेश नांदगावकर आदी उपस्थित होते.