जिल्ह्याला उद्या अति मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी:- मागील काही दिवसांपासून जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने बुधवारी काहीशी उघडीप दिली. मात्र गुरुवारी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस पावसचा जोर कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पडझड आणि नुकसान कायम आहे.

जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 27.44 मिमी तर एकूण 247 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात मंडणगड तालुक्यात 8 मिमी, दापोली 63 मिमी, खेड 14 मिमी, गुहागर 22 मिमी, चिपळूण 13 मिमी, संगमेश्वर 24 मिमी, रत्नागिरी 44 मिमी, राजापूर 50 मिमी आणि लांजा 9 मिमी. इतका पाऊस पडला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात
दापोली तालुक्यात मौजे पंढरी येथील मनोहर पावसे यांच्या पक्क्या घराचे अंशत: 32 हजार तर मौजे हर्णे येथील मुज्जीमीन काझी यांच्या कच्च्या घराचे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात मौजे धामणवणे येथील सुधीर जाधव यांच्या घराचे अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात मौजे वेलदूत येथील अर्जुन जांभळे यांच्या घराचे अंदाजे 83 हजार 200 तर मौजे धोपावे येथील सीता जाधव यांच्या घराचे 5 हजार 800 रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरचे नुकसान हे अंशत: आहे.